ठाणे: अमेरिका येथील न्यूयॉर्क शहरातील संयुक्त राष्ट्रांच्या (युएन) मुख्यालयात २८ आणि २९ मे २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थांचे जागतिक चर्चासत्र झाले. या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडचे अध्यक्ष शरद गांगल यांना मिळाला.
या सहभागामुळे आंतरराष्ट्रीय पटलावर भारतीय सहकार क्षेत्राची दखल घेतली गेली आहे. ठाणेकर शरद गांगल यांचा सहभाग समस्त ठाणेकरांसाठी गौरवास्पद आणि टीजेएसबी सहकारी बँकेसाठी अभिमानास्पद ठरला आहे. या परिषदेत जनता सहकारी बँक पुणेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब हेही सहभागी झाले होते.
जागतिक स्तरावर सहकारी बँकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह अलायन्स’ (ICA) च्या अंतर्गत कार्यरत असलेल्या इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकिंग असोसिएशन’ (आयसीबीए) द्वारे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन ‘आयसीए’ने शरद गांगल यांना विशेष निमंत्रण पत्र पाठवून आमंत्रित केले होते.
सर्वसमावेशक आर्थिक वृद्धी हा परिषदेचा केंद्रबिंदू होता. या दोन दिवसीय उच्चस्तरीय जागतिक परिषदेमध्ये, सहकारी बँका आणि क्रेडिट युनियन्सच्या माध्यमातून शाश्वत वित्तीय प्रणाली कशी उभारता येईल, यावर विचारमंथन झाले. सहकारातून समताधिष्ठित आणि शाश्वत विकास यावर परिषदेत भर देण्यात आला.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी वित्तीय साहाय्य करून त्याचे सक्षमीकरण, शेतकरी आणि महिला उद्योजकांच्या आर्थिक उन्नतीसाठी नाविन्यपूर्ण योजना राबवणे, समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणणे. आणि मध्यमवर्गीयांची घराच्या स्वप्नपूर्तीसाठी मध्यमवर्गीय सुलभ गृहकर्ज उपलब्ध करून देणे यावर चर्चा झाली. संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात जागतिक धोरणांवर चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय नागरी सहकारी बँकिंग कार्यप्रणालीची अधिकृत नोंद घेतली गेली.