८२ कोटींची तरतूद
भाईंदर: दहिसर ते मीरा-भाईंदर दरम्यान धावणाऱ्या मेट्रो ९ मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि स्थानकांपर्यंत सहज पोहोचण्यासाठी मुख्य मार्गावर सात नवीन पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या कामाला मंजुरी दिली असून सुमारे ८२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
दहिसर-मीरा-भाईंदर मेट्रो मार्गिका ९ मधील दहिसर ते काशिगाव दरम्यानचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. तर पुढील दुसऱ्या टप्प्याचे काम सुरु आहे. मेट्रो ९ प्रकल्प हा सुमारे ११ किलोमीटर लांबीचा आणि आठ स्थानकांचा मार्ग आहे. या मार्गावरील स्थानकांपर्यंत सुरक्षित व सुलभ जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी मल्टी-मोडल इंटिग्रेशन (एमएमआय) योजनेअंतर्गत हे नवे पादचारी पूल उभारले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना गजबजलेल्या रस्त्यांवरून सुरक्षितपणे प्रवास करता येणार आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर टोलनाका आणि मीरागाव येथे प्रत्येकी एक, तर मीरा-भाईंदर रोडवरील काशीगाव, शिवार गार्डन, मॅक्सस मॉल, वेज सागर हॉटेल आणि साईबाबा नगर येथे प्रत्येकी एक असे एकूण सात पादचारी पूल उभारले जाणार आहेत.
सर्व पुलांची रुंदी तीन मीटर असेल. या पुलांमध्ये जिने, लिफ्ट तसेच सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना स्थानकांपर्यंत सहज पोहोचता येणार आहे.
या सुविधेमुळे पादचारी अपघातांचा धोका कमी होण्यास मदत होणार असून मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. तसेच स्थानक परिसरातील गर्दीचे व्यवस्थापन सुलभ होऊन वाहतुकीचा प्रवाहही सुरळीत राहण्यास मदत होणार असल्याची माहिती एमएमआरडीएतर्फे परिपत्रक काढून देण्यात आली आहे.