आई-बाबा, मतदान करूनच गावाला जाऊ !

* विद्यार्थ्यांनी लिहिले आई-बाबांना पत्र
* बाळवाडी भगिनी मंडळ शाळेचा अनोखा उपक्रम

अंबरनाथ : दर पाच वर्षानी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान नक्की करण्याचा आग्रह धरणारे पत्र विद्यार्थ्यांनी त्यांचे आई-बाबाना पाठवून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे.

मतदार जागरूकता अभियानांतर्गत अंबरनाथ येथील साई विभागातील भगिनी मंडळ संचलित बाळवाडी भगिनी मंडळ शाळा क्रमांक एकच्या विद्यार्थ्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आई, बाबा, आजी, आजोबा यांना शाळेतून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पत्रे लिहिली आहेत.

शाळेच्या सचिव मेघा आठल्ये आणि मुख्याध्यापिका प्रतिभा निपुरते तसेच सहकारी शिक्षिका यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. शाळेतर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध शालेय उपक्रम राबवले जातात. पुढील महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान जनजागृती अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा मतदान गीत गायन, विद्यार्थ्यांची रॅली, घरोघरी मतदानाबाबत जनजागृती केली आहे.

मतदान हा प्रत्येक नागरिकाचा महत्वाचा अधिकार आहे, लोकशाहीमुळे अनेक सोयी, सुविधा आणि अधिकार नागरिकांना दिले आहेत. योग्य व्यक्तीला मतदान केल्यास देशाच्या विकासासाठी हातभार लागेल. नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून सार्वभौम आणि शक्तिशाली राष्ट्र उभारणीत योगदान द्यावे. 18 वर्षांवरील युवकांनी आणि नागरिकांनी विचारपूर्वक मतदानाचा हक्क बजवावा, मतदान करून शक्तिशाली राष्ट्र उभारणीसाठी सहकार्य करावे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. मे महिना असला आणि शाळेला सुट्टी असली तरी मतदान करूनच यंदा गावाला जाऊ या आणि अशा आशयाची अनेक पत्रे लिहून विद्यार्थी त्यांच्या पालकांना पोस्टाद्वारे पाठवली जाणार आहेत.