कबुतरांना दाणे टाकण्यास विरोध; बाप-लेकीस मारहाण

भाईंदर: मीरारोडच्या काशिमिरा परिसरात कबुतराला दाणे टाकण्यास मनाई केल्याने एका वृद्धास मारहाण व मुलीचा गळा दाबून लोखंडी रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल तक्रारीनुसार, काशिमिरा पोलीस ठाण्यापासून अंतरावर असलेल्या डिबी झोन इमारती ३० मध्ये राहणारे महेंद्र पटेल (६९) रविवारी सकाळी दूध आणण्याकरता इमारतीखाली गेले. यावेळी समोरच्या इमारतीमध्ये राहणार्‍या आशा व्यास (५६) इमारतीच्या परिसरात कबुतरांना दाणे टाकत होत्या. दरम्यान वयोवृद्ध व्यक्ती महेंद्र पटेल यांनी आपण सार्वजनिक ठिकाणी कबुतराला दाणे टाकू नका असे सांगितले. या गोष्टीचा राग मनात धरून व्यास यांनी या वृद्धास शिवीगाळ केली.

हा सर्व गोंधळ पटेल यांच्या मुलीला कळल्यानंतर ती देखील घटनास्थळी पोहोचली. आपण माझ्या वडिलांना शिवीगाळ का करत आहात? असे विचारले असता व्यास यांनी पटेल यांची मुलगी प्रेमल (४६) यांना देखील शिवीगाळ केली.

हा सर्व गोंधळ सुरू असताना व्यास यांच्या इमारतीमध्ये राहणार्‍या सोमेश अग्निहोत्री यांच्यासह अनोळखी इसमाने प्रेमल हिला लोखंडी रोडने मारले आणि गळा देखील दाबला, अशी तक्रार आहे. याप्रकरणी चार व्यक्तींविरोधात काशीमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.

कबुतरांची विष्ठा,पीसे आदींमुळे मानवी जीवितास गंभीर आजार होण्याची शक्यता असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने कबूतरखान्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र स्थानिक पोलीस व महापालिकेकडून अद्यापही कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.