खुल्या प्रवर्गातील इच्छुकांना ओबीसी आरक्षणाचा धसका!

ठामपाची निवडणूक आरक्षण सोडत पुढील आठवड्यात

ठाणे: ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची लगबग सुरु झाली असून पुढील महिन्यात ९ किंवा १० नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. जातीगत आरक्षणावरून उफाळलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रभागात ओबीसी आरक्षण पडू नये याकरिता अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. परंतु नशिब कोणाला साथ देते हे आरक्षणानंतर स्पष्ट होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण काढण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आरक्षणाच्या जागा जनगणनेनुसार ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान जाहीर करून त्याची निवडणूक आयोगाकडून मान्यता घ्यावी लागणार आहे. ८ ते ११ नोव्हेंबर दरम्यान आरक्षण सोडत काढून आरक्षित प्रभागाची मान्यता निवडणूक आयोगाकडून घ्यावी लागणार आहे. १७ ते २४ नोव्हेंबर दरम्यान जाहीर झालेल्या आरक्षणावर हरकती आणि सूचना मागविण्यात येणार असून २७ ते १ डिसेंबरपर्यंत हरकती आणि सूचनांवर सुनावणी होऊन २ डिसेंबरला अंतिम आरक्षण जाहीर केले जाणार आहे.

ठाणे महापालिकेत १३१ नगरसेवकांचे ३३ पॅनल आहेत. त्यामध्ये सात जागा या अनुसूचित जातीकरिता तर तीन जागा अनुसूचित जमातीकरिता आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. मागील वेळी प्रभाग क्रमांक सहा लोकमान्य नगर, शास्त्री नगर, परेरा नगर, सात वर्तकनगर, रेमंड, लक्ष्मी-चिराग नगर, समता नगर, प्रभाग क्र. ९ पारसिक, संघवी हिल्स, आनंद विहार, खारीगाव, प्रभाग क्र. १५ इंदिरा नगर, साठेनगर, आंबेवाडी, जय भवानी नगर, प्रभाग २२ खारटन रोड सेंट्रल जेल, महागिरी, चेंदणी कोळीवाडा, प्रभाग क्र. २४ विटावा, भोलेनाथ नगर गणपती पाडा आणि प्रभाग क्र. २८ दिवा, आगासन, म्हातारडी बेतावडे, बेडेकर नगर हे सात प्रभाग अनुसूचित जातीकरिता आरक्षित होते. तर प्रभाग क्र. १ ओवळा, कासारवडवली, भाईंदर पाडा कावेसर, प्रभाग क्र. ५ येऊर, पवार नगर, वसंत विहार आणि प्रभाग क्र. २४ विटावा, भोलानाथ नगर, गणपती पाडा हे तीन प्रभाग अनुसूचित जमातीकरिता आरक्षित होते. २७ टक्के जागा या इतर मागासवर्गीय समाजाकरिता आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या.

महापालिकेत ५० टक्के जागा ह्या महिलांकरिता आरक्षित ठेवण्यात येणार आहेत, त्यामुळे अनुसूचित जातीच्या महिलांना चार तर अनुसूचित जमातीच्या महिलांकरिता दोन जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत. या आरक्षित जागेचे आरक्षण काढले जाणार आहे तसेच १२१ जागांमधून ओबीसीकरिता २७ टक्के आरक्षण काढले जाणार आहे.

१३१ नगरसेवकांच्या जागांपैकी ५० टक्के जागा ह्या महिलांकरिता आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे पुरुषांच्या वाट्याला केवळ ६५ जागा शिल्लक राहणार आहेत. त्यामधूनही तीन जागा अनुसूचित जाती तर एक जागा अनुसूचित जमातीकरिता राखीव ठेवली जाणार आहे. ओबीसीकरिता २७ टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार असल्याने खुल्या वर्गातील इच्छुकांना देवावर भरोसा ठेवावा लागणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार चिंतेत पडले आहेत.