ठाणे: सावरकर नगर परिसरातील नाल्यामध्ये आज सकाळी सुमारे आठ फूट लांबीचा अजगर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना सकाळी अंदाजे ११.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
या घटनेची माहिती एका नागरिकाने ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान (एक इमर्जन्सी वाहनासह) तसेच कोकणी पाडा येथील वाइल्ड वेल्फेअर असोसिएशनचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
संयुक्त प्रयत्नांद्वारे नाल्यात अडकलेला अजगर सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत अथवा जीवितहानी झाली नाही. सुटका केलेला अजगर पुढील काळजी आणि देखरेखीसाठी संस्थेच्या ताब्यात देण्यात आला आहे.