भिवंडी: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या आज शुक्रवारी झालेल्या मतमोजणीनंतर सायंकाळी अत्यंत धक्कादायक निकाल हाती आले असून लक्षवेधी मतमोजणीत भाजपने जोरदार मुसंडी मारत समाजवादी पक्षाचा सफाया केला आहे.
या निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांना साधे खाते देखील उघडता आलेले नाही. मात्र कोणार्क विकास आघाडीने आपले पूर्ण पॅनल निवडून आणून पुन्हा एकदा भिवंडी महापालिकेवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अटीतटीच्या व लक्षवेधी झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळेल नसल्याने महापालिकेत सत्तास्थापन करण्यासाठी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने शहरात काँग्रेस, भाजप, शिवसेना, समाजवादी पक्ष व इतर पक्षांनी कंबर कसून आपली प्रचार यंत्रणा राबविली. मात्र या निवडणुकीत भाजप पक्ष सोडला तर कोणत्याही राजकीय पक्षाला आपले वर्चस्व निर्माण करता आलेले नाही. गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने ४७ जागा मिळवून बहुमत प्राप्त केले होते. मात्र या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन व समाजवादी पक्षाचे आमदार राईस शेख यांच्यामध्ये काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्याबाबत जोरदार चुरस निर्माण झाली. त्यामुळे काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. आणि त्याच्या फटका समाजवादी व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बसला आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ५८ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी काँग्रेस पक्षाला ३० जागा जिंकता आल्या. तर समाजवादी पक्षाला अवघ्या सहा जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये व उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे माजी खासदार सुरेश टावरे यांच्या मुलाला पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्याचा फटका देखील काँग्रेसला बसल्याची चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेस पक्षाची तिकिटे समाजवादीचे आमदार राईस शेख यांनी आपल्या समर्थकांना वाटप केली. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे निवडून आलले काही उमेदवार हे आमदार शेख यांच्या सोबत बसणार आहे.
समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी यांनी या निवडणुकीत ५४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. मात्र त्यांच्याच पक्षाचे भिवंडी पूर्व विधानसभा आमदार राईस शेख यांच्याशी तीव्र मतभेद, गटबाजी झाल्याने या निवडणुकीत समाजवादीला जोरदार फटका बसून त्यांना अवघ्या सहा जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचारांमध्ये उघड-उघड मदत केली. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार फायदा झाला असून ३७ पैकी १२ जागांवर त्यांना विजय मिळाला आहे. तर मोठा गाजावाजा करीत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार फटका बसला असून २४ जागांवर उभे असलेल्या उमेदवारांना खाते उघडता आले नाही.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे शिवसेना व मनसे यांची युती झाली होती. मात्र भिवंडीत ती टिकली नाही. त्यामुळे भिवंडीत ठाकरे शिवसेनेने २८ जागा लढवून देखील त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. तर मनसेने दोन जागेवर उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांना सुद्धा आपले उमेदवार विजयी करता आले नाहीत. या निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला नाही तरी देखील भिवंडीत धनुष्यबाणाच्या चिन्हावर २० पैकी १२ उमेदवार विजयी झाले आहे. तर गेल्या निवडणुकीत १८ जागा मिळविणाऱ्या भाजपने जोरदार मुसंडी मारून ३२ पैकी २२ जागा जिंकून आणल्या.
या निवडणुकीत एकूण १९ राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपले नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये ११ पक्षांना आपल्या उमेदवारांना विजयी करता आले नाही. या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही त्यामुळे बहुमताचा एकदा गाठण्यासाठी युती व महाआघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पक्षीय बलाबल
भाजप-२२, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-३०, आम आदमी पार्टी-०, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)-०, शिवसेना (शिंदे)-१२, मनसे-०, राष्ट्रवादी काँग्रेस (शप)-१२,भारतीय कम्युनिस्ट पक्ष-०, समाजवादी पक्ष-६, एमआयएम-०, आरपीआय एकतावादी-०, कोणार्क विकास आघाडी-४, पीस पार्टी -०, लोकहिन्द पार्टी-०, वंचित बहुजन आघाडी-०, जयहिंद सेना -०, भिवंडी विकास आघाडी-३, अपक्ष-१