उबाठा गट आणि साई पक्षाला मोठा धक्का
उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी ३७ आणि शिवसेनेने (शिंदे गट) ३६ जागांवर विजय मिळवत महापालिकेवर वर्चस्व सिद्ध केले आहे तर उद्धव ठाकरे गट (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेला खातेही उघडता न आल्याने मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप शिवसेना युती झाली नाही तर दोन नगरसेवक निवडून आलेली वंचित बहुजन आघाडी किंग मेकर ठरू शकते. दरम्यान साई पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
निवडणुकीपूर्वी जिल्ह्याचे प्रभावी नेते धनंजय बोडारे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र त्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रभाग क्रमांक १५ मधून शिवसेना शिंदे गटाचे अरुण आशान यांनी बोडारे यांचा पराभव केला. दुसरीकडे, काँग्रेसच्या अंजली साळवे यांनी आपली जागा राखण्यात यश मिळवले आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, भाजपा ३७, शिवसेना शिंदे गट ३६, वंचित बहुजन आघाडी २, साई पक्ष १, काँग्रेस १ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला ४० जागांचा टप्पा गाठण्यासाठी आता भाजपा आणि शिंदे गटात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
विविध प्रभागांमधील निकालांवर नजर टाकल्यास, प्रभाग १ मध्ये भाजपाच्या अर्चना करंकाळे आणि भावना ओवळेकर तर शिंदे गटाचे पूजा भोईर व दिलीप गायकवाड विजयी झाले. प्रभाग ५ मध्ये शिंदे गटाच्या सीमा कलानी यांनी बाजी मारली, तर प्रभाग ६ मध्ये विकीसिंग लबाना, प्रेरणा माखीजानी, जया माखीजा आणि महेश सुखरामानी अशा शिंदे गटाच्या पूर्ण पॅनेलने विजय मिळवून वर्चस्व राखले. प्रभाग ११ मध्ये भाजपाच्या पूर्ण पॅनेलने (प्रीती माखीजा, रवी जग्यासी, कविता पंजाबी, प्रवीण कृष्णानी) साई पक्षाच्या उमेदवारांना धूळ चारली. प्रभाग १८ मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सुरेखा सोनावणे आणि विकास खरात यांनी दणदणीत विजय मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या निकालांमुळे उल्हासनगरच्या राजकारणात आता नवीन समीकरणांची नांदी झाली आहे.
पक्षीय बलाबल
भाजपा-37
शिवसेना (शिंदे गट)-36
वंचित आघडी-2
साईं पक्ष-1
काँग्रेस 1
अपक्ष-1