डम्पिंग नाही म्हणजे नाहीच!

डायघर ग्रामस्थ उपोषणाच्या तयारीत

ठाणे : भंडार्ली येथील तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या कचरा प्रकल्पाला विरोध झाल्यानंतर १ सप्टेंबरपासून डायघर प्रकल्प सुरु होणार होता, मात्र ग्रामस्थांचा विरोध कायम असल्याने प्रकल्प सुरू करण्याची तारीख आणखी १५ दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडार्लीचा प्रकल्प ३१ ऑगस्टनंतर बंद करण्यात येणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. हा प्रकल्प बंद करून डायघर येथील पालिकेच्या जागेवर कचरा प्रकल्प सुरु केला जाईल असेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. डायघर येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरु करण्याचा पालिकेचा मानस आहे. या ठिकाणी यंत्रणा देखील आणली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु आता या कचरा प्रकल्पाला देखील स्थानिकांनी विरोध करण्यास सुरवात केली आहे.

१५ ऑगस्ट रोजी येथील काही गावकऱ्यांनी दत्त मंदिरात बैठक घेऊन या प्रकल्पाला विरोध केला होता. या बैठकीत पंचक्रोशी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून काही झाले तरी कचरा प्रकल्प होऊ देणार नसल्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे. त्यानंतरही १ सप्टेंबर रोजी डायघर प्रकल्प सुरु करण्याची घोषणा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र आता दिलेल्या मुदतीत देखील डायघर प्रकल्प सुरु होणार नसून यासाठी आता १५ सप्टेंबरपासून हा प्रकल्प सुरु होण्याची शक्यता वरिष्ठ सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे डायघरचा प्रकल्प सुरु होण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.