नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही लोकसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याचा दावा केला. आता, बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याची चर्चा रंगली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही ‘इंडिया’ आघाडीची साथ सोडणार असल्याची माहिती मिळत आहे.
नितीश कुमार पुन्हा भाजपा प्रणित ‘एनडीए’ आघाडीबरोबर जाण्याची शक्यता आहे. याला भाजपाकडून मंजुरीही मिळाली असून बिहारची विधानसभा बरखास्त केली जाऊ शकते. भाजपानं आपल्या सर्व आमदारांना पाटण्यात बोलावून घेतलं आहे, अशी माहिती सूत्रांनी राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिली.
नितीश कुमारांना थांबवण्यासाठी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव सक्रिय झाले आहेत. लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आहे. तर, काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.