ठाणे: राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रदेश सरचिटणीस आणि ठाणे समन्वयक आनंद परांजपे यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून त्यांनी आपला राजीनामा कळवला.
प्रवक्ता, ठाणे समन्वयक आणि महाराष्ट्र सरचिटणीस पदासोबतच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वचा देखील त्यांनी राजीनामा दिला आहे. ”मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस तथा प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश, समन्वयक ठाणे व पालघर (जिल्हा) व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. आजपर्यंत पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून पक्ष संघटनेमध्ये अनेक जबाबदाऱ्या दिल्या. त्याबद्दल मी पक्षाचा शतशः आभारी आहे, तरी माझा राजीनामा आपण स्विकारावा ही नम्र विनंती”, अशा चार ओळींच्या आशयात आनंद परांजपे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे, आनंद परांजपे आता कुठल्या पक्षात जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीत मोठी चढाओढ लागली होती. त्यामध्ये, अखेर झिशान सिद्दीकी यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेची आमदारकी दिली. त्यामुळे, आनंद परांजपे हे नाराज असल्याची चर्चा होती. मागील काही दिवसांपासून ते नाराज होते. विधान परिषद, राज्यसभा अशा दोन्ही निवडणुकांवेळी त्यांना नाकारण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवीर अखेर आज त्यांनी राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
आनंद परांजपे हे शिवसेनेत जाणार अशी चर्चा आहे, त्यांनी गेल्या काही दिवसांत दोनवेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली आहे. त्यामुळे, ते पुन्हा शिवसेनावापसी करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण, राज्यात शिवसेना एकसंघ असताना त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, परांजपे कुठे जाणार याबाबत त्यांनी कोणतीही घोषणा केलेली नाही.