महासभेवर बहिष्कार घालण्याचा शरद पवार गटाचा आरोप
ठाणे: ठाणे महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य, स्थायी समिती, परिवहन समिती, शिक्षण समिती निवडीबाबत राज्य शासनाने दिशानिर्देश दिले आहेत. मात्र, ठामपातील सत्ताधारी टाळाटाळ करीत आहेत. आगामी महासभेत याबाबत निर्णय न घेतल्यास सर्वसाधारण सभेवर राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक बहिष्कार घालतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला आहे.
15 जानेवारी 2026 रोजी ठामपाची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर फेब्रुवारी किंवा मार्चमधील सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात येणार होती. मात्र, या निवडीस स्थगिती देण्यात आलेली आहे. ठामपाच्या सोबतच ज्या महानगर पालिकांच्या निवडणुका झाल्या आहेत, त्या महानगर पालिकांमध्ये विशेष समित्या निवडण्यात आल्या आहेत. मात्र, फेब्रुववारीमध्ये होणारी स्वीकृत तथा स्थायी समितीची निवड जवळपास तीन महिने उलटून गेल्यानंतरही झालेली नाही. त्यामुळे स्थायी समितीचे विषय सर्वसाधारण सभेत येत असल्याने वेळ वाया जाऊन आर्थिक नुकसानच होत आहे. शिवाय, स्वीकृत सदस्य निवडले जात नसल्याने अभ्यासू आणि तज्ज्ञ लोक सभागृहात स्थानापन्न होऊ शकत नाहीत; हा प्रकार असाच सुरू राहिला तर आमचे नगरसेवक सर्वसाधारण सभेवर बहिष्कार घालतील, असे मनोज प्रधान म्हणाले.
सर्वसाधारण सभेत भाजप-सेनेतील वादाबाबत मनोज प्रधान यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर आगपाखड केली. ते म्हणाले, सेना-भाजपने निवडणुक एकत्र लढविली आहे. आता ते सत्तेत एकत्र आहेत. तरीही, ज्या पद्धतीने सेनेला विरोध करण्याची भूमिका घेत आहेत; ते पाहता, भाजपकडून सर्कस सुरू करण्यात आलेली आहे. सत्तेत सहभागी होऊन सत्तेलाच आव्हान देण्याची भाजपची कृती कशासाठी आहे, न समजायला जनता दुधखुळी नाही. विरोधक म्हणून आम्ही विषयपत्रिकेवर अभ्यास करून सभागृहात बसत असतो. मात्र, भाजपचे नगरसेवक नाहक वाद निर्माण करून सभागृहाचे कामकाज उधळवून लावत आहेत. जर, त्यांना विरोध करायचाच असेल तर सत्तेबाहेर येऊन आमच्या नेतृत्वाखाली विरोध करावा.
भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी आणि आमच्या नगरसेविका पल्लवी जगताप यांनी महासभेचे थेट प्रक्षेपण करावे, अशी मागणी केली आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुंबई महानगरपालिकेचे कामकाज मुंबई महानगरपालिका या अधिकृत युट्यूब चॅनेलवर थेट पाहिले जाऊ शकते. मात्र, ठामपाच्या सत्ताधाऱ्यांना आपले उपद्व्याप ठाणेकरांसमोर येऊ नयेत, असे वाटत असल्यानेच थेट प्रक्षेपण केले जात नाही, असेही प्रधान म्हणाले.