उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ज्येष्ठ नगरसेवकांना मार्गदर्शन
ठाणे: ठाणे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवकानी निधी कसा मिळवायचा याचे मार्गदर्शन नवीन नगरसेवकांना करावे, तो निधी स्वतःला ठेऊ नये, असा मोलाचा सल्ला शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिला.
ठाणे महापालिकेतील शिवसेना गटनेते पवन कदम यांच्या कार्यालयाचे उदघाटन करण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे हे महापालिकेत आले होते. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सल्ला दिला.
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ७५ एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले आहेत. ठाणेकरांनी बाळासाहेब ठाकरे आणि कै. आनंद दिघे यांच्या विचारावर प्रेम करून मागिल अनेक वर्षे सेनेला महापालिकेत सत्ता दिली आहे. शिवसेना आणि ठाणे हे समीकरण वेगळे असून शिवसेना देखील ठाण्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कट्टीबद्ध आहे. ठाणे हे कोंडीमुक्त शहर केले जाणार आहे. या शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत केली जाणार आहे. शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री असताना भरभरून निधी देण्यात आला होता. यापुढेही निधीची कमतरता पडणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थिती नागरिकांना दिला.
शिवसेनेच्या शाखा जशा ठाणेकरांचा आधार आहेत, त्याचप्रमाणे महापालिकेतील शिवसेनेचे कार्यालय सर्वपक्षीय नगरसेवक आणि ठाणेकरांचा आधार बनले पाहिजे, अशी सूचना यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली.
महापालिकेत मागिल काही दिवस शिवसेना भाजपा यांच्यातील वादाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कि छोट्या-मोठ्या कुरबुरी होत असतात, त्या यापुढे होणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, खा. नरेश म्हस्के, सभागृह नेते हणमंत जगदाळे, गटनेते पवन कदम यांच्यासह महापालिकेतील आजी-माजी नगरसेवक, नागरिक उपस्थित होते.