शोएब सय्यदच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर एनबी इक्वीपमेन्ट अँड इंजिनीरिंग (एनबीइइ) ने 48व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल मैदानावर शुक्रवारी झी एंटरटेनमेंटचा 80 धावांनी पराभव केला.
नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत झी एंटरटेनमेंटने एनबीइइला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सय्यदने 35 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांसह केलेल्या 44 धावांच्या खेळीमुळे एनबीइइने 27.1 षटकांत 177 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. सलामीवीर अझर अन्सारीने (27 चेंडूत 25 धावा) चांगली सुरुवात केली आणि भूषण सावंत (36 चेंडूत 31 धावा) याच्या साथीने चांगली फलंदाजी करत स्थिर पाया रचला. त्यानंतर तन्मय केणीने 17 चेंडूत पाच चौकारांसह 28 धावांची खेळी केली. झी एंटरटेनमेंटसाठी शशिकांत लाटेकर (3/39) सर्वात यशस्वी गोलंदाज होता.
प्रत्युत्तरात, झी एंटरटेनमेंट 27.2 षटकात 97 धावांवर बाद झाले. सय्यदने चेंडूनही उत्कृष्ट कामगिरी केली कारण त्याने सात षटकांत, ज्यात एका मेडनचा समावेश होता, 24 धावा धाव देऊन चार महत्वाच्या विकेट्स पटकावल्या. पहिल्या डावात बॅटने केलेल्या योगदानानंतर, दुसऱ्या डावात अन्सारीने तीन गडी बाद करून चेंडुनेसुद्धा कमाल केली. झी एंटरटेनमेंटच्या फलंदाजांमध्ये, सलामीवीर दर्पण मेहता ह्याने सर्वाधिक धावा बनवल्या. त्याने 20 चेंडूत 17 धावा केल्या, ज्यात तीन चौकारांचा समावेश आहे.
संक्षिप्त धावफलक: एनबीइइ 27.1 षटकांत सर्वबाद 177 ( शोएब सय्यद 44; एस लाटेकर 3/39) विजयी वि. झी एंटरटेनमेंटचा 27.2 षटकांत सर्वबाद 97 (दर्पण मेहता 17; शोएब सय्यद 4/24)