राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत हृदित्य, काश्वी, त्रिशाने जिंकली पदके

जिहांश पाटीलचा डबल धमाका

ठाणे : महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स संघटनेने कोपरगाव येथे आयोजित कनिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेत ठाण्याच्या जिहांश पाटीलने ५० मीटर धावण्याच्या शर्यतीत १५ दिवसांपूर्वी नोंदवलेला स्वतःचाच जिल्हा विक्रम पुसून टाकताना नवा उच्चांक नोंदवला.

ट्रॅक अँड फिल्ड मास्टर्स संघाच्या जिहांशसह हृदित्य कवीश्वर, काश्वी करंजकर आणि त्रिशा गाला यांनी आपल्या संघासह ठाणे जिल्ह्याला पदके जिंकून दिली.

जिहांशने ५० मीटर धावण्याच्या शर्यतीत ठाणे जिल्हा अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेत रचलेला ७.५ सेकंदाचा जिल्हा विक्रम मागे टाकताना ७.३२ सेकंदाचा विक्रम प्रस्थापित केला. याशिवाय जिहांशने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत १४.२८ सेकंदासह राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील दुसरे सुवर्ण पदक निश्चित केले. कनिष्ठ गटात ५० मीटर धावण्याच्या शर्यतीत हृदित्यने ८.७८ सेकंद अशा कामगिरीसह अव्वल स्थान मिळवले.

मुलींच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत काश्वीने १५.७ सेकंद अशी वेळ नोंदवून वैयक्तिक रौप्य पदक पक्के केले. या स्पर्धेत अवघ्या ०.०१ सेकंदाने काश्वीला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली तर अवघ्या सहा महिन्यांपासून धावण्याच्या सरावास सुरुवात करणाऱ्या त्रिक्षाने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत १७.८३ सेकंद अशा वेळेसह १०० मीटर धावण्याच्या शर्यतीतील कांस्यपदक जिंकले.