वसई: नालासोपारा पूर्वेच्या भागात घरभाड्याने घेऊन त्यातून अमली पदार्थांचे मोठे रॅकेट चालवणाऱ्या नायजेरियन टोळीवर तुळींज पोलिसांनी कारवाई केली आहे. या छाप्यात तब्बल चार कोटी ८३ लाख रुपये किमतीचे कोकेन आणि एमडीएमए हे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून एका २६ वर्षीय नायजेरियन महिलेला अटक करण्यात आली आहे.
नालासोपारा पूर्वेच्या मोरेगाव येथील नरिया नगरमधील ‘वैष्णवी अपार्टमेंट’च्या पहिल्या मजल्यावरील एका सदनिकेत एक परदेशी महिला ड्रग्जची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तुळींज पोलीसांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी ६ वाजता छापा टाकला. छाप्यादरम्यान घरात उपस्थित असलेली नायजेरियन महिला ओमो्रोग्बे मेरीट ईनाघेडे हिची झडती घेतली असता तिच्याकडे मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ आढळून आले.
या कारवाईत पोलिसांनी तीन कोटी ३१ लाख ५० हजार रुपये किमतीचे ६६३ ग्रॅम वजनाचे पांढऱ्या रंगाचे कोकेन जप्त केले आहे. तसेच एक कोटी ५१ लाख ५० हजार रुपये किमतीच्या गुलाबी, हिरवा, निळा आणि पिवळ्या रंगाच्या एमडीएमए किंवा एक्स्टसी गोळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. याशिवाय १० हजार रुपयांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून असा एकूण चार कोटी ८३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.