डॉक्टर-परिचारिकांचे वेतनही बँक गॅरंटीमधून देणार
ठाणे: ठाणे महापालिकेने पाच वर्षांत ‘आपला दवाखाना’ या योजनेसाठी कंत्राटदारांच्या घशात २९ कोटी घातल्यानंतर ही योजनाच गुंडाळण्याची तयारी महापालिकेने सुरु केली आहे. विशेष म्हणजे मुदतीआधीच संबंधित कंपनीने दवाखाने बंद केल्याने डॉक्टर, परिचारिकांचे पगार रखडले असून ते बँक गॅरंटीच्या माध्यमातून अदा करण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे.
‘आपला दवाखाना’ या योजनेंतर्गत सुरू असलेले दवाखाने ऑगस्टमध्येच बंद करून संबंधित कंत्राटदार कंपनीने गाशा गुंडाळला. दरम्यान येथे काम करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सचे वेतन थकल्याने या कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली होती. श्री.केळकर यांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर महापालिका उपायुक्त उमेश बिरारी यांनी सोमवारी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात 21 जून 2019 रोजी आपला दवाखाना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्नाटकच्या मेडिगो या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले. या कंपनीच्या माध्यमातून शहरांमध्ये ५० दवाखाने सुरु करण्याचा कार्यादेश देण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने 46 दवाखाने सुरू करण्यात आले. संबंधित कंत्राटदारांचा कालावधी ऑगस्ट 2025 पर्यंत होता आणि त्यानंतर ते कंत्राट संपुष्टात येणार होते. मात्र कंत्राट संपुष्टात येऊनही नवीन निविदा प्रक्रिया ठाणे महापालिकेकडून राबवण्यात आली नाही. या दरम्यान पालिकेने केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून ठाणे शहरासाठी एकूण 68 अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर म्हणजे नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर मंजूर झाले. या 68 नागरी आरोग्य बंदीसाठी येणारा संपूर्ण खर्च हा केंद्रशासनामार्फत केला जाणार आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हे एकूण 12 दवाखाने ठाणे शहरासाठी मंजूर झालेले आहेत. असे एकूण 80 नवीन दवाखाने सुरु करण्यात येत असल्याने आपला दवाखानासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याची आवश्यकता उरली नाही अशी माहिती उपायुक्त बिरारी यांनी दिली. या नवीन केंद्रामुळे आपला दवाखान्याच्या कंत्राटदाराला पुन्हा काम मिळाले नाही.
दरम्यान गेल्या पाच वर्षांत पालिकेने कंत्राटदारावर पाच वर्षात २९ कोटींचा खर्च केला आहे. तर या पाच वर्षात १९ लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी आपला दवाखाना या योजनेचा फायदा घेतला आहे असा दावा पालिकेने केला आहे. मात्र आता ही योजनाच गुंडाळण्याच्या तयारीत पालिका असल्याने पालिकेच्या योजनाच वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
46 आपला दवाखान्यासाठी औषध, जागेचे भाडे, दवाखान्यात काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सचा पगार देण्याची जबाबदारी ही संबंधित कंत्राटदाराची होती. कंत्राटदाराने 46 पैकी 16 दवाखाने जवळ-जवळ बंद केले आणि ती बंद केल्यानंतर तीन दवाखाने त्याला ऑक्टोबर अखेरपर्यंत पर्यंत सुरू ठेवण्याची सूचना पालिकेकडून करण्यात आली होती. दरम्यान संबंधित कंपनीने डॉक्टर्स आणि नर्सचा पगार देखील दिला नाही. याउलट 15 ऑक्टोबर 2023 रोजी आमच्याकडे असलेले डॉक्टर, परिचारिकांचा पगार आणि जागा मालकांचे भाडे हे पालिकेने कंपनीला देय असलेल्या तीन कोटींच्या बँक गॅरंटीमधून देण्यात यावे असे पत्र दिले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना महापालिका कंपनीच्या बॅंक गॅरंटीमधून वेतन अदा करणार आहे.
अधिकाऱ्यांवर कारवाई करा- आ.केळकर
‘आपला दवाखाना’ ही योजना महापालिकेने सुरू केल्यानंतर हे दवाखाने सुरळीत चालावेत, कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर द्यावेत, जागेचे भाडे वेळोवेळी देण्यात यावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवणे गरजेचे होते. परंतु ढिसाळ कारभारामुळे ही योजना बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर आली. त्याचा फटका गरीब गरजू रुग्णांनाही बसला आहे. या प्रकरणात महापालिकेने हात वर करण्याचा प्रयत्न केला असला तरी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.