राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी नजीब मुल्ला

ठाणे: राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी पुन्हा एकदा ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांची एकमताने निवड करण्यात आली असून अजित पवार गटाने आज त्यांच्या गटाची नोंदणी केली.

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत सहावेळा निवडून येणारे श्री.मुल्ला हे राबोडी प्रभाग क्र. १०मधून प्रचंड मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे नऊ नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिका कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या मुल्ला यांनी महापालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी देखिल काम केले आहे. अभ्यासु नगरसेवक अशी त्यांची ख्याती आहे. काल राष्ट्रवादीच्या कार्यालयात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी एकमताने श्री.मुल्ला यांना गटनेते पदाला मान्यता दिली होती. आज कोकण भवन येथे या नगरसेवकांनी त्यांच्या गटाची स्थापना केली.