बदलापूर: बदलापुरात शालेय विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणाची घटना घडली असताना आज पुन्हा बदलापुरात एका प्री स्कूलमध्ये शिकणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना घडल्याने बदलापुरात संतापाची लाट उसळली आहे.
बदलापूर पश्चिम भागातील एका प्रीस्कूलमध्ये शिकणारी चार वर्षीय विद्यार्थिनी आज गुरुवारी नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेली होती. दररोज दुपारी दीडच्या सुमारास स्कूल व्हॅनने ती घरी येते. मात्र दीड वाजून गेला तरी मुलगी घरी परत न आल्याने तिच्या आईने मुलीला शाळेत घेऊन जाणाऱ्या आणि शाळेतून घरी सोडणाऱ्या स्कूल व्हॅन चालकाला तीन चार वेळा कॉल केला. त्यानंतर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मुलगी घरी पोहचली. त्यावेळी ती प्रचंड घाबरलेली होती. आईने तिला याबाबत विश्वासात घेऊन विचारल्यानंतर तिने तिच्यावर घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. तिच्या आईने तातडीने मुलीच्या वडिलांना फोन करून याबाबत माहिती देताच तिचे वडील घरी पोहचले. त्यानंतर या मुलीच्या आई वडिलांनी तसेच त्यांच्या शेजारच्या लोकांनी शाळेत जाऊन याबाबत माहिती दिली. मात्र शाळेकडून अपेक्षित सहकार्याची भूमिका न दिसल्याने त्या सर्वांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेऊन या संतापजनक प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी स्कूल व्हॅन चालकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बदलापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष प्रियांका दामले व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी संगीता चेंदवणकर यांनी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबत माहिती जाणून घेतली. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी उप नगराध्यक्षा दामले आणि चेंदवणकर यांनी केली. यापूर्वी बदलापुरात समोर आलेल्या शालेय विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणातही दामले व चेंदवणकर यांनी आवाज उठवला होता.
चेंदवणकर यांनी “ती”व्हॅन फोडली
ज्या व्हॅनमध्ये संतापजनक घटना घडली, ती व्हॅन पोलिसांनी ताब्यात घेऊन बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात आणली. या व्हॅनच्या काचेवर विट मारून राष्ट्रवादीच्या पदाधिकारी संगीता चेंदवणकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला.