डावले येथे अतिक्रमणावर कारवाई करताना नायब तहसिलदारावर हल्ला

प्रभाग समितीच्या दुर्लक्षामुळे
मुंब्र्यात भूमाफियांची मुजोरी

ठाणे: मुंब्र्यात प्रभाग समितीने भूमाफियांना पाठीशी घातल्यानेच अनधिकृत इमारतींचे पेव फुटल्याचे उघडकीस आले असतानाच आज डावले येथे कारवाईस गेलेल्या नायब तहसीलदारांसह तलाठी आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यापर्यंत या भूमाफियांची मजल गेल्याचे पाहायला मिळाले.

ठाण्यातील मुब्र्यांमधील डावले गाव याठिकाणी भूमाफियांनी शासकीय भूखंडावर (कलेक्टर लॅडं) वर अतिक्रमण करुन दोन तीन मंजली इमारत उभारुन त्यात अतिक्रमण केले होते. बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयांचे अंतर्गत तहसीलदार ठाणे येथील नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांच्या माध्यमातून येथे कारवाई करण्यात आली. यावेळी ठाणे महापालिकेचीही मदत घेण्यात आली.

दोन मजली इमारत पाडल्यानतंर भूमाफियांनी घोळका करुन नायब तहसिलदार दिनेश पैठणकर आणि शीळ तलाठी रोहन वैष्णव यांच्यावर हल्ला करत अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. त्यानतंर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानतंर भूमाफियांनी तेथून पळ काढला. नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांच्यासह तलाठ्यावर हल्ला केल्याप्रकरणी शीळ डायघर पोलिस ठाण्यात तीन भूमाफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांनी डावले गावमधील अतिक्रमणधारकांना एक महिन्याची मुदत दिली आहे. त्यानंतर ही कारवाई पूर्ण करणार असल्याचे नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितले. या कारवाईवेळी मंडळ अधिकारी रविंद्र काळे, तलाठी रोहन वैष्णव, तलाठी विश्वनाथ राठोड, तलाठी जीवन कोरे, तलाठी प्रीती घुडे, तलाठी राहुल भाटकर, तलाठी राहुल भोईर आणि ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुंब्रा प्रभाग समिती हद्दीत सर्वाधिक अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या आहेत आणि अनेक इमारतींची बांधकामे सुरू आहेत. सहायक आयुक्त सागर साळुंखे यांनी केलेल्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळेच मुंब्र्यात भूमाफियांची दांडगाई वाढली असून अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. त्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी जोर धरत असताना आयुक्तांनी त्याकडे कानाडोळा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.