थकबाकीमुळे १०५ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित

वीज चोरीबाबत पोलिसांत गुन्हे दाखल

ठाणे : ‘महावितरण’ने थकीत देयकापोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर देयकाची रक्कम ताबडतोब जमा करण्याऐवजी, वीजचोरी करणा-या टिटवाळा उपविभागातील १०५ ग्राहकांनी वीजचोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

मुरबाड पोलीस ठाण्यात वीजचोरीचे गुन्हे नुकतेच दाखल झाले आहेत. महावितरणच्या पथकाने टिटवाळा परिसरात धडक कारवाई करून ५४ लाख ५६ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणलेल्या १०५ ग्राहकांचा यात समावेश आहे.

त्यानुसार मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

टिटवाळा, मांडा, बल्याणी, अष्टविनायक चाळ, श्रीदेवी चाळ भागात थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांची तपासणी केली. कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व कल्याण मंडळ दोनचे अधिक्षक अभियंता दिलीप ळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवण्यात आली. या तपासणीत १०५ जणांकडून वीजेचा चोरटा वापर सुरू असल्याचे आढळले. त्यानुसार संबंधितांना चोरीच्या विजेचे देयक व तडजोडीची रक्कम भरण्याबाबत नोटिस देण्यात आली. परंतु विहित मुदतीत रकमेचा भरणा न केल्यामुळे संबंधितांविरुद्ध मुरबाड पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली.

टिटवाळ्याचे उपकार्यकारी अभियंता गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंता निलेश महाजन व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

थकबाकीपोटी एकदा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकीत वीजबिलाचा भरणा व पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला जात नाही. अशा ग्राहकांनी परस्पर वीज जोडणी, शेजारी किंवा इतरांकडून वीज घेतल्याचे आढळल्यास संबंधित ग्राहक व त्यांना वीज पुरविणारा अशा दोघांविरुद्धही फौजदारी अथवा दंडात्मक कारवाई करण्यात येते.