ठाणे : मुंबई विद्यापीठ दूरस्थ शिक्षण (आयडॉल) प्रथम वर्ष/सत्र पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रम (एमएमएस) परीक्षेला ‘फायनान्शियल मॅनेजमेंट’ऐवजी ‘फायनान्शियल अकाऊंट’ची प्रश्नपत्रिका देण्याचा मोठा घोळ मुंबई विद्यापीठाने २३ जानेवारी २०२४ रोजी केला.
‘आयडॉल’च्या प्रथम वर्ष /सत्र व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी होऊ घातलेल्या परीक्षेला ‘फायनान्शियल मॅनेजमेंट सत्र दोनऐवजी फायनान्शियल अकाऊंट’ सत्र १ या विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. तेव्हाच परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी ही बाब लक्षात आणून दिली. मात्र या विषयाची प्रश्नपत्रिकाच उपलब्ध नसल्यामुळे परीक्षा रद्द करुन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक दूरस्थ शिक्षण विभाग येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी आपला नोकरी-व्यवसाय करुन शिक्षण घेत असतात. त्यामुळे त्यांना सुट्टया मिळणेही कठीण असते. या सर्व बाबींची तडजोड करुन परीक्षा देत असतात. त्यांना पुन्हा सुट्टी मिळणे कठीण असते. त्यामुळे आजच्या प्रश्नपत्रिका बदलास जबाबदार असलेल्या अधिका-यावर तसेच दुसरी आणि प्रश्नपत्रिका तयार न ठेवण्यासाठी जबाबदार शिक्षकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी लेखी मागणी ‘मुंबई विद्यापीठ युवासेना, माजी व्यवस्थापन परिषद’चे प्रदीप सावंत आणि राजन कोळंबकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुुरु प्रा.(डॉ) रविंद्र कुळकर्णी यांच्याकडे केली.
‘आयडॉल’च्या प्रत्येक विषयाच्या तीन प्रश्नपत्रिका तयार असतात. परंतु, आजच्या परिक्षेला एकही प्रश्नपत्रिका तयार नव्हत्या. या भोंगळ कारभाराला जबाबदार शिक्षक आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. परीक्षेला चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आली, अशी तक्रार विद्यार्थ्यांकडून प्राप्त झाल्यानंतर कुलगुरुंना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही, असे सावंत, कोळंंबकर म्हणाले.
आज सकाळच्या सत्रात दूर व मुक्त अध्ययन संस्थेची एमएमएस सत्र २ या अभ्यासक्रमाची परीक्षा होती. काही तांत्रिक कारणास्तव फिनांशियल मॅनेजमेंट सत्र २ ऐवजी फिनांशियल अकाऊंट सत्र १ या विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. ही बाब लक्षात आल्यानंतर या विषयाची आयडॉलकडे उपलब्ध असलेली या विषयाची प्रश्नपत्रिका देण्याची तयारी सुरू केली. परंतु या विषयाची परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. यानुसार फिनांशियल मॅनेजमेंट सत्र २ या विषयाची परीक्षा पुढे ढकलून येत्या ११ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात येणार आहे.