आर्यराज निकमच्या अविस्मरणीय हॅटट्रिकने ४८व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेची धमाकेदार सुरुवात झाली. निकमने एकूण सहा गडी बाद केले आणि त्याच्या कमालीच्या कामगिरीमुळे मुंबई पोलिसांनी मंगळवारी सेंट्रल मैदानावर महिंद्रा लॉजिस्टिकवर १५८ धावांनी मोठा विजय मिळवला.
या ३५ षटकांच्या सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना, मुंबई पोलिसांनी रोहित पोळच्या (४० चेंडूत ५८ धावा) अस्खलित अर्धशतकाच्या जोरावर ३३.३ षटकात २१६ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. मुंबई पोलिसांना ३५ षटकांच्या आत बाद करण्यासाठी परतिक गुप्ता याचे मोलाचे योगदान होते. या उजव्या हातच्या वेगवान गोलंदाजाने महिंद्रा लॉजिस्टिक्ससाठी गोलंदाजीची सुरुवात केली आणि सात षटकांत ४० धावा देऊन पाच गडी बाद केले.
२१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना महिंद्रा लॉजिस्टिक्सला १२.५ षटकांत केवळ ५८ धावांत मुंबई पोलिसांनी गुंडाळले. महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या फलंदाजांचा दिवस अत्यंत खराब गेला. त्यांनी ७.१ षटकांत तीन गडींच्या मोबदल्यात ४६ धावा करून सावध सुरुवात केली होती. मात्र, पुढच्या ५.४ षटकांत खेळ पूर्णपणे फिरला. त्या ३४ चेंडूत महिंद्रा लॉजिस्टिक्सने फक्त १२ धावा जोडल्या आणि उर्वरित सात विकेट्स गमावल्या.
निकमने टाकलेले डावातील ११ वे षटक सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. त्याने त्या षटकात सलग चार चेंडूंत चार बळी घेत महिंद्र लॉजिस्टिकच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने किफायतशीर गोलंदाजी करून १.५ षटकात दोन धावा खर्च केल्या आणि सह विकेट्स पटकावल्या.
सामन्याच्या पहिल्या डावात, निकम (७ चेंडूत ६ धावा) यानी सुनील पाटील (१६ चेंडूत २५ धावा) सोबत मुंबई पोलिसांसाठी फलंदाजीची सुरुवात केली. जरी त्याने बॅटने फारसे काही केले नसले तरी त्याने सामन्याच्या दुसऱ्या डावात चेंडूने लक्षणीय प्रदर्शन करून दिवस आपल्या नावावर करून घेतला.