मुंबई महिला क्रिकेट संघाने अरुणाचल प्रदेशवर ३८८ धावांनी ऐतिहासिक विजय नोंदवला

मुंबई महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास

मुंबई महिला क्रिकेट संघाने सिनियर महिला एकदिवसीय करंडक स्पर्धेत अरुणाचल प्रदेशवर ३८८ धावांनी विक्रमी विजय मिळवत नवीन वर्षाचे स्वागत शैलीत केले आहे. नवी दिल्लीतील पालम II येथील एअरफोर्स कॉम्प्लेक्स ग्राउंडवर ४ जानेवारी रोजी झालेल्या या सामन्यात मुंबईने अरुणाचल प्रदेशचा सर्वात मोठ्या फरकाने (धावांनी) पराभव करून इतिहास रचला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ५० षटकांत पाच गडी गमावून ४१९ धावा केल्या. सानिका चाळके (५२ चेंडूत ५९) आणि रिया चौधरी (८३ चेंडूत ९६) यांनी अर्धशतके ठोकली तर वृषाली भगत (८३ चेंडूत १०२ धावा) आणि सायली सातघरे (७७ चेंडूत १०० नाबाद) यांनी शानदार शतके झळकावली. मुंबईच्या फलंदाजांनी त्यांचे ‘खडूस’ क्रिकेट खेळले आणि अरुणाचल प्रदेशला त्यांच्यावर भारी पडण्याची काही संधी दिली नाही.

दुसऱ्या डावात जेव्हा मुंबई गोलंदाजी करण्यासाठी आले, तेव्हा त्यांनी अरुणाचल प्रदेशला २३.४ षटकात केवळ ३१ धावांवर बाद केले. लेगस्पिनर प्रकाशिका नाईकने ६.४ षटकात (ज्यात दोन मेडन्सचा समावेश होता) फक्त पाच धावा देऊन पाच गडी बाद केले.  तिला वेगवान गोलंदाज सायमा ठाकोरने चांगली साथ दिली, जिने पाच मेडन्ससह सात षटकात दोन धावा देऊन तीन विकेट्स पटकावल्या.

मुंबईचा पुढील सामना ६ जानेवारी रोजी छत्तीसगड विरुद्ध नवी दिल्लीतील सेंट स्टीफन मैदानावर होणार आहे.