करोना काळातील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या हालचाली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा

करोना काळात ठाणे महापालिकेंतर्गत विविध विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. याप्रश्नी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा केली असून आयुक्त याबाबत सकारात्मक आहेत. या मागणीचे निवेदन घेऊन शिवसेनेचे शिष्टमंडळ माजी महापौर अशोक वैती यांच्यासोबत शुक्रवारी आयुक्त राव यांना भेटले. त्यामुळे गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर या कर्मचाऱ्यांना ‘बाप्पा’ पावण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिकेच्या विविध विभागात काम करणाऱ्या करोना काळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १४ ऑगस्ट रोजी भेट घेतली. यावेळी या कर्मचाऱ्यांनी प्रामुख्याने ठाणे पालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत शिंदे यांना साकडे घातले. याप्रश्नी शिंदे यांनी तत्काळ पालिका आयुक्त राव यांच्याशी चर्चा केली असून गणेशोत्सवाआधी याबाबत बैठक होणार असल्याची माहिती माजी महापौर अशोक वैती यांनी शुक्रवारी दिली.

या प्रश्नाबाबत वैती यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त राव यांची भेट घेतली. याप्रसंगी उपनेत्या अनिता बिर्जे, माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते, ॲड. प्रियंका सांगरे व करोना काळातील कर्मचारी वर्गाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कर्मचाऱ्यांच्या वयाची अट, कामाचा अनुभव याबाबतही येत्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे वैती यांनी नमूद केले. पुढील आठवड्यात ही बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्यस्थितीत ठाणे महापालिकेची भरती प्रक्रिया सुरु असून या कर्मचाऱ्यांना या प्रक्रियेदरम्यान आशेचा किरण दिसत आहे. अधिकाधिक या कर्मचाऱ्यांना ठाणे पालिकेच्या सेवेत कसे कायम करता येईल, याबाबत चाचपणी सुरु आहे.