मान्सूनने दिली साथ; भातलावणीला आला वेग

शहापुरात १५,२५५ हेक्टरवर खरीप भात लागवडीचे लक्ष्य

शहापूर: शहापूर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामातील भातलावणीला वेग आला असून पुरेशा पावसामुळे शेतकरी मोठ्या उत्साहाने शेतीकामात व्यस्त झाले आहेत. तालुक्यात यंदा १५,२५५ हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून बहुतांश भागात रोपलागवडीची कामे वेगाने सुरू आहेत. पावसाचा समाधानकारक वेग कायम राहिल्यास यंदा भात उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

शहापूर तालुका हा ठाणे जिल्ह्यातील प्रमुख भात उत्पादक तालुक्यांपैकी एक मानला जातो. येथील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून असल्याने मान्सूनचे आगमन आणि पावसाचा नियमितपणा हा उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक ठरतो. यंदा वेळेत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार करून आता मुख्य शेतांमध्ये भातलावणीला गती दिली आहे.

कृषी विभागामार्फत सुधारित वाणांचे बियाणे, संतुलित खत व्यवस्थापन, जैविक खतांचा वापर तसेच यांत्रिक भातलावणीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मजुरांची कमतरता लक्षात घेऊन काही भागात यांत्रिक रोपलावणीचा वापर वाढताना दिसत आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च कमी होण्यास आणि काम वेळेत पूर्ण होण्यास मदत होत आहे. दरम्यान लागवडीनंतर योग्य पाणी व्यवस्थापन, तणनियंत्रण, संतुलित खतांचा वापर आणि कीड-रोगांवर वेळेत नियंत्रण ठेवल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते. हवामानातील बदलामुळे अतिवृष्टी किंवा दीर्घ खंड पडल्यास त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे शेतीनिष्ठ शेतकरी जयवंत आप्पा तारमळे यांनी सांगितले. तथापि शहापूर तालुक्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेतीवर आधारित असून भात हे येथील प्रमुख पीक आहे. त्यामुळे खरीप हंगामाचे यश हे केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर ग्रामीण अर्थ व्यवस्थेसाठीही महत्त्वाचे मानले जाते. यंदा मान्सूनची साथ कायम राहिल्यास शहापूर तालुक्यातील भात उत्पादन समाधानकारक होईल अशी आशा शेतकरी आणि कृषी विभागाने व्यक्त करीत आहे.

खते, बियाणे किंवा कीटकनाशकांची जादा दराने विक्री, साठेबाजी, कृत्रिम टंचाई निर्माण करणे, बिल न देणे किंवा सक्तीने इतर वस्तू खरेदी करण्यास भाग पाडणे असे प्रकार आढळल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय किंवा राज्य शासनाच्या टोल-फ्री कृषी हेल्पलाइन १८००-१८०-१५५१ वर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. तक्रार करताना दुकानाचे नाव, पावती, दर आणि संबंधित माहिती उपलब्ध करून दिल्यास तातडीने कारवाई करण्यात येईल असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.