खारफुटीवर बेकायदा भराव; भूमाफियांना अधिकाऱ्यांचे अभय

महासभेत नगरसेविकांचा घणाघात

ठाणे : परवानगी नसताना मुंब्रा-दिवा परिसरातील खारफुटीवर सुरू असलेल्या बेकायदा माती भरावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून भूमाफियांना अभय देणाऱ्यांवर कारवाई करा आणि संपूर्ण बेकायदा भराव तातडीने हटवा, अशी मागणी सभागृहात करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नगरसेविका मर्जीया पठाण यांनी हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. “महापालिकेची कोणतीही परवानगी नसताना खारफुटीत मातीचा भराव सुरू राहतो, डम्परची अखंड ये-जा होते, तरीही संबंधितांविरोधात गुन्हे दाखल होत नाहीत. मग भूमाफियांना नेमके संरक्षण कोण देत आहे?” असा थेट सवाल त्यांनी केला. पवई आणि मुलुंड परिसरातून येणाऱ्या डम्परमधून मोठ्या प्रमाणावर माती टाकली जात असल्याचा आरोप करत त्यांनी या अवजड वाहनांमुळे रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. केवळ पत्रव्यवहार करून प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचा आरोप करत, अनधिकृत बांधकामे उभी राहिल्यानंतर ती तोडण्यापेक्षा भरावाच्याच टप्प्यावर कारवाई का होत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनीही विसर्जन घाट परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

प्रशासनाकडून उत्तर देताना प्रभारी मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या चव्हाण यांनी संबंधित जागा खासगी मालकीची असून महसूल आणि वन विभागाने याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. तर उपायुक्त मनीष जोशी यांनी डम्परमुळे रस्त्यांचे होणारे नुकसान, चिखल आणि घनकचरा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच स्वच्छता निरीक्षकांमार्फत परिसरावर नियमित देखरेख ठेवण्याचे आश्वासन दिले.