अस्वच्छ पाणपोईमुळे येऊरवासींचे आरोग्य धोक्यात
ठाणे : साडेपाच हजार कोटींहून अधिक रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या ठाणे महापालिकेच्या हद्दीतील येऊर भागात बुरशी लागलेली टाकी आणि अस्वच्छ पाणपोई यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या के. वृषाली यांनी दिली.
येऊर येथील एअर फोर्स स्टेशन समोर असलेली पाणपोई गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छ करण्यात आलेली नसून पाणपोईची टाकी बुरशीने वेढलेली आहे. टाकीवर झाकण म्हणून मेणकापड टाकण्यात आलेले असून पाणी पिण्यास अयोग्य झालेले आहे. पाणीटंचाईच्या काळात येथील नागरिक या पाणपोईचा वापर करत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पाणपोईची दुरवस्था पाहून सामाजिक कार्यकर्त्या के वृषाली यांनी थेट आयुक्तांना पत्र लिहून संताप व्यक्त केला आहे. पावसाळ्यात या पाणपोईचा वापर केल्यास कावीळ, कॉलरा, टॉयफॉईड, गॅस्ट्रो, डेंग्यू, मलेरिया आदी साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची भीती त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.
ही जुनाट आणि अस्वच्छ पाणपोई तत्काळ बंद करून परिसराचे निर्जंतुकीकरण करावे, जुनाट ड्रम हटवून त्या जागी फिल्टरयुक्त अत्याधुनिक पाणपोई बसविण्यात यावी. पाण्याची नासाडी थांबविण्यासाठी ऑटो कट सेन्सर यंत्रणा बसवावी त्याचबरोबर शहरातील सर्व सार्वजनिक पाणपोइंचे स्ट्रक्चरल ऑडीट आणि वॉटर क्वालिटी ऑडीट करावे, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.
येत्या १५ दिवसांत पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन अटळ आहे तसेच प्रसंगी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा के वृषाली यांनी पत्राद्वारे दिला आहे.