गावदेवी मंडई अग्नीकांडानंतर प्रशासन जागे
ठाणे: गावदेवी भाजी मंडईतील अग्निकांडात अग्निशमन दलाचे अधिकारी आणि प्रभाग समितीमधील आरक्षकाचा मृत्यू झाल्यानंतर अग्निशमन विभागातील त्रुटी उघड्या पडल्या. या घटनेनंतर प्रशासन जागे झाले असून येत्या तीन महिन्यांत विभाग सक्षम करताना ६०१ कर्मचाऱ्यांची मेगा भरती करण्यात येणार आहे.
गावदेवी मंडईला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेची पडसाद या महासभेतही उमटले असून अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांनी घटनेचा कालक्रम, आग विझवण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न तसेच दुर्घटनेतील जीवितहानीची माहिती सभागृहाला दिली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी प्रशासनाच्या वतीने उपाययोजनांची माहिती देताना अग्निशमन विभागातील मनुष्यबळाच्या कमतरतेकडे लक्ष वेधले. सध्या विभागात ८३५ पदे मंजूर असताना केवळ ३२५ अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. ही तफावत दूर करण्यासाठी ६०१ पदांची भरती प्रक्रिया हाती घेण्यात आली असून विभागाच्या क्षमतेत लक्षणीय वाढ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अग्निशमन कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण, मॉक ड्रिल आणि आधुनिक उपकरणांची सुविधा दिली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दुर्घटनेत शहीद झालेल्या दोन जवानांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. त्याचबरोबर शहरात नवीन अग्निशमन केंद्रे उभारणे, वाहनांची संख्या वाढविणे आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना राबविल्या जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
गावदेवी मंडईतील नियमबाह्य व्यवसाय, अतिरिक्त गाळे आणि अनधिकृत वापर आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला. यावेळी भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी शहरातील हॉटेल्स, पोटमाळे आणि अनधिकृत बांधकामांमधील अग्निसुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. नगरसेवक सुनेश जोशी यांनी मंडईतील सुरक्षा रक्षकाच्या कॅबीनचा अन्य कारणांसाठी वापर होत असल्याचा आरोप केला. नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी प्रशासनाच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कारवाईसाठी ठोस कालमर्यादा जाहीर करण्याची मागणी केली.
पालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला. अग्निशमन आणि अभियांत्रिकी विभागातील भरतीसाठी पुढील दोन दिवसांत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आणि तीन महिन्यांच्या आत भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच शहरातील रुग्णालये, शाळा, व्यापारी संकुले आणि अन्य महत्त्वाच्या आस्थापनांचे फायर ऑडिट एका महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अग्निशमन जवानांसाठी विमा संरक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आणि अत्याधुनिक उपकरणांची उपलब्धता यावर विशेष भर दिला जाणार असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सर्वंकष अग्निसुरक्षा आराखडा राबविण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.