आमदाराच्या खासगी सुरक्षा रक्षकाची परिचारिकांना शिवीगाळ?

कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

भाईंदर : मीरा-भाईंदर शहराचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या सुरक्षा रक्षकाने भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना घडल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या परिचारिकांनी व कर्मचाऱ्यांनी काम बंद करून भाईंदर पोलीस ठाणे गाठले.

भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी हे शासकीय रुग्णालय आहे. गुरुवारी सकाळी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचे सुरक्षा रक्षक अरविंद रूंजारे हे कुत्रा चावल्याने उपचारासाठी रुग्णालयात गेले होते. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यास सांगितले. मात्र, यामुळे संतप्त झालेल्या सुरक्षा रक्षकाने उपस्थित परिचारिका व रुग्णालय कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी निषेध म्हणून काम बंद केले आणि तक्रार दाखल करण्यासाठी भाईंदर पोलीस ठाणे गाठले. आपण कोणालाही शिवीगाळ केली नसून, रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाने अरेरावी केल्यामुळे वाद झाल्याचा दावा अरविंद रुंजारे यांनी केला आहे.

या प्रकरणी तक्रार देण्यासाठी रुग्णालयाचे कर्मचारी पोलीस ठाण्यात आले असून, त्यांची तक्रार ऐकून घेतल्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी दिली.