‘छत्री-One by Two’ला रसिकांची उत्स्फूर्त दाद

प्रेम, पाऊस, कविता आणि सुरांची मनमोहक मैफल

ठाणे: पावसाच्या सरींनी वातावरण आल्हाददायक झाले असताना प्रेम, पाऊस, कविता आणि गाण्यांचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी ठाणेकर रसिकांना ‘छत्री-One by Two’ या नव्या सांगीतिक कार्यक्रमातून मिळाली.

मनमंजिरी क्रिएशन्स निर्मित आणि लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि. सहप्रायोजित या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग शुक्रवार १७ जुलै रोजी सहयोग मंदिर सभागृहात रंगला. सुमारे अडीच तास चाललेल्या या मैफिलीत शब्द, स्वर आणि भावनांच्या सरींनी प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.

मराठी आणि हिंदी चित्रपटांसह जिंगल्स, मालिका, नाटके आणि सिंगल्ससाठी गीतलेखन करणारे प्रसिद्ध गीतकार-कवी मंदार चोळकर यांच्या संकल्पना व संहितेतून हा कार्यक्रम साकार झाला. त्यांच्या आगळ्यावेगळ्या शैलीतील कवितांनी कार्यक्रमाला वेगळीच उंची मिळवून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.जे. मानसी सावंत यांनी केले. त्यांच्या खुमासदार निवेदनातून कविता, गाणी आणि संवाद यांची सुंदर गुंफण प्रेक्षकांना अनुभवता आली. यावेळी प्रसिद्ध गायक-संगीतकार मंदार आपटे आणि गायिका-अभिनेत्री दीपाली देसाई यांनी मराठी व हिंदीतील प्रेम आणि पावसावर आधारित जुन्या-नव्या गीतांची सुरेल मैफल सादर केली. दर्जेदार वाद्यवृंदाच्या साथीने सादर झालेल्या या गीतांना रसिकांकडून भरभरून दाद मिळाली. अनेक गाण्यांना ‘वन्स मोअर’चीही मागणी झाली.

दर्दी रसिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत रंगलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ ठाणे यांनी केले होते. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. ‘ठाणेवैभव’ने या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर म्हणून सहकार्य केले.

या यशस्वी पहिल्या प्रयोगानंतर पावसाळ्याच्या कालावधीत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर आदी शहरांमध्ये या कार्यक्रमाचे आणखी सहा ते सात प्रयोग आयोजित करण्याचे नियोजन सुरू आहे. या मैफिलीसाठी विविध संस्था व प्रायोजकांनी पुढाकार घ्यावा तसेच पुढील प्रयोगांसाठी 9082139737 किंवा 9820178158 यावर संपर्क साधावा, असे आवाहन मनमंजिरी क्रिएशन्सच्या कल्याणी फलटणकर यांनी केले आहे.