ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा
ठाणे: नव्याने शाळेत प्रवेश करणारे आणि जुन्या विद्यार्थ्यांसाठी आजचा शाळेचा पहिला दिवस खास आणि अविस्मरणीय ठरला. खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार राजेश मोरे हे स्वागतासाठी हजर राहिल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.
नवीन शैक्षणिक वर्ष सोमवारपासून सुरू झाले. त्याअनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची पाहणी, विद्यार्थ्यांचे स्वागत, दत्तक शाळा उपक्रम यांच्या निमित्ताने प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वर्तकनगर येथील ठामपा शाळा क्रमांक ४४ येथे विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांच्याशी संवाद साधला तसेच नवीन पुस्तकांचे वाटप केले. विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतानाच राज्य शासनाच्या प्रवेशोत्सव उपक्रमाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. त्याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, शिक्षणाधिकारी कमलाकांत मेहेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार नरेश म्हस्के यांनी किसन नगर मधील ठामपा शाळा क्रमांक २३ शाळेतील विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत केले. आज शाळेचा पहिला दिवस. या शाळेचे विद्यार्थी असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज येऊ शकले नाहीत. परंतु, त्यांचे लक्ष आपल्या या शाळेवर आहे. आजच्या पहिल्या दिवसाची सुरुवात जशी उत्साहात झाली तसाच प्रत्येक दिवस हा उत्साहात शिका व आपल्या आईवडिलांचे, शाळेचे नाव मोठे करा, शिक्षकांचा आदर राखा, अशा शब्दात खासदार नरेश म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, योगेश जानकर, संध्या मोरे, शिक्षणाधिकारी कमलाकांत मेहेत्रे, गट अधिकारी संगीता बामणे आदी उपस्थित होते. त्यानंतर, खासदार नरेश म्हस्के यांनी टेंभी नाका येथील ठामपा शाळा क्रमांक ०७ येथेही विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, योगेश जानकर उपस्थित होते.
आमदार संजय केळकर यांनी आझाद नगरमधील ठामपा शाळा क्रमांक ५५मध्ये विद्यार्थ्यांसमवेत प्रवेशोत्सव साजरा केला. त्यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके आणि खाऊ यांचे वाटप केले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना त्यांनी प्रवेशोत्सव उपक्रमाचे कौतुक केले तसेच शिक्षक आणि पालक यांचेही अभिनंदन केले. यावेळी, माजी नगरसेवक एकनाथ मढवी उपस्थित होते.
आमदार राजेश मोरे यांनी खिडकाळी येथे ठामपा शाळा क्रमांक ८९मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांना गुलाब पुष्प, नवीन पुस्तके यांचे वाटप केले. विद्यार्थ्यांना उज्जल यशासाठी आणि आनंददायी शिक्षणासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी १०० शाळा भेटी आणि दत्तक शाळा योजनेत शाळांची पाहणी केली. तसेच, विद्यार्थ्यांचे स्वागत केले. अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी कळवा येथील ठामपा शाळा क्रमांक ६९ आणि किसन नगर येथील शाळा क्रमांक २३मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तर. अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांनी ज्ञानसाधना येथील ठामपा शाळा क्रमांक १८ मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यासह, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त सचिन सांगळे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त दिनेश तायडे, उपायुक्त मधुकर बोडके, उपायुक्त अनघा कदम, उपायुक्त मिताली संचेती, उपायुक्त शंकर पाटोळे, सर्व सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ अधिकारी यांनीही शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियानांर्गत शाळेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून विविध शाळांमध्ये उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात, श्रीरंग विद्यालय, आ. जे. ठाकूर विद्यालय, सुलोचनादेवी सिंघानिया विद्यालय, ठामपा शाळा, पानखंडा, घोलाई नगर पाण्याची टाकी आदी ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.