प्ले-ऑफच्या उंबरठ्यावर मुंबई; बेंगळुरूविरुद्ध ‘करो की मरो’ सामना

वूमन्स प्रीमियर लीग (WPL) 2026 मध्ये आज वडोदऱ्यातील कोटांबी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्ध सामना खेळताना गतविजेते मुंबई इंडियन्स अक्षरशः तारेवरची कसरत करताना दिसतील. दोन वेळा विजेतेपद पटकावलेला आणि सातत्यपूर्ण संघांपैकी एक असलेला मुंबई संघ यंदा अनपेक्षित दबावाखाली आहे. सहा सामन्यांत केवळ दोन विजय मिळवल्यानंतर आता चुकांसाठी अजिबात जागा उरलेली नाही. आजचा RCB विरुद्धचा सामना आणि शेवटचा साखळी सामना गुजरात जायंट्स (GG) विरुद्ध, हे दोन्ही सामने जिंकणे मुंबईसाठी अत्यावश्यक आहे, अन्यथा प्ले-ऑफचे स्वप्न धूसर होऊ शकते.

या हंगामात मुंबईने गुजरात जायंट्सवर मात केली होती, मात्र पहिल्याच सामन्यात RCB कडून त्यांना पराभव मिळाला होता.

WPL 2026 ची सुरुवात नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडेमीत झालेल्या MI–RCB या ‘ब्लॉकबस्टर’ लढतीने झाली आणि तो सामना थराराक ठरला. 155 धावांचा पाठलाग करताना, RCB ने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला. अखेरच्या षटकात 18 धावांची गरज असताना आणि तीन विकेट शिल्लक असताना सामना किंचितसा मुंबईच्या बाजूने झुकलेला वाटत होता. मात्र नॅटली सिव्हर-ब्रंटच्या गोलंदाजीवर नडिन डी क्लर्क फलंदाजीला असताना RCB च्या आशा जीवित होत्या.

गेल्याच वर्षी विशाखापट्टणम येथे झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या साखळी सामन्यात भारताविरुद्ध डी क्लर्कने खेळलेली निर्णायक खेळी मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या मनात नक्कीच ताजी असावी. त्या आठवणींचीच पुनरावृत्ती डी क्लर्कने यावेळी केली. षटकाची सुरुवात दोन डॉट चेंडूंनी झाली असली, तरी तिने संयम आणि आत्मविश्वास कायम राखला. शेवटचे चार चेंडू म्हणजे जणू हायलाईट्स — ६, ४, ६, ४ आणि RCB ने थरारक विजय मिळवत आपल्या मोहिमेला जबरदस्त दिशा दिली.

यानंतर RCB चा आत्मविश्वास अधिकच वाढत गेला. सलग चार सामने जिंकत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. मात्र शनिवारी तीन वेळा अंतिम फेरी गाठलेल्या दिल्ली कॅपिटल्सकडून त्यांना हंगामातील पहिला पराभव स्वीकारावा लागला. सहा सामन्यांत 10 गुणांसह RCB ने आधीच प्ले-ऑफमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. तरीही हा सामना स्मृती मानधना आणि तिच्या संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबईवर विजय मिळवला, तर गुणतालिकेत अव्वल स्थान निश्चित होईल आणि थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल, एलिमिनेटरचा अडथळा टळेल.

दुसरीकडे, संपूर्ण स्पर्धेत मुंबई इंडियन्स लय शोधताना दिसले आहेत. हेली मॅथ्यूजच्या दुखापतीमुळे संघाचा समतोल बिघडला आणि सलामीच्या जोडीमध्ये सतत प्रयोग करावे लागले. मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही. सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेला मुंबई संघ दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्सच्या मागे आहे, तर RCB तिन्ही संघांपेक्षा पुढे आहे.

प्ले-ऑफचे गणित आणखी गुंतागुंतीचे आहे. गुजरात जायंट्सचे शेवटचे दोन सामने दिल्ली आणि मुंबईविरुद्ध आहेत, तर दिल्लीचा अखेरचा साखळी सामना तळाशी असलेल्या यूपी वॉरियर्सविरुद्ध होणार आहे. वॉरियर्स देखील अजून शर्यतीत आहेत आणि RCB व DC वर विजय मिळवण्यात यशस्वी ठरले, तर तेही प्ले-ऑफमध्ये धडक मारू शकतात. त्यामुळे मुंबईसाठी केवळ स्वतःचे सामने जिंकणे पुरेसे ठरणार नाही; इतर सामन्यांचे निकालही त्यांच्या बाजूने लागावे लागतील.

तरीही ‘जर-तर’च्या गणितात अडकण्यापेक्षा, मुंबई इंडियन्सला आपल्या हातातील गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागेल – आज RCB वर विजय आणि त्यानंतर शुक्रवारी गुजरात जायंट्सविरुद्ध आणखी एक निर्णायक सामना जिंकणे.

मुंबईची सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे फलंदाजीतील सातत्याचा अभाव. धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये हरमनप्रीत कौर (सर्वाधिक धावा करणाऱ्यांची यादीत दुसऱ्या क्रमांकावर) आणि सिव्हर-ब्रंट (पाचव्या क्रमांकावर) यांच्याशिवाय कोणतीही फलंदाज 150 धावांचा टप्पा ओलांडू शकलेली नाही. गोलंदाजीतही धार कमी जाणवली असून अमिलिया कर आणि निकोला कॅरी हेच अव्वल 10 विकेट घेणाऱ्यांत स्थान मिळवू शकले आहेत. कर्णधार आणि परदेशी खेळाडूंवर असलेले अतिवलंबन संघाला महागात पडले आहे. भारतासाठी खेळलेल्या अमनजोत कौर आणि सजीवन सजना यांसारख्या खेळाडूंनी अधिक जबाबदारी घेऊन खेळण्याची अत्यावश्यकता आहे.

RCB चा सध्याचा फॉर्म आणि आत्मविश्वास पाहता त्यांना हरवणे सोपे नसेल. मात्र संकटातही उभे राहण्याची कला जर कोणत्या संघाला अवगत असेल, तर तो मुंबई इंडियन्सच आहे. संपूर्ण हंगाम पणाला लागलेला असताना हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघाला अखेरचा जोर लावावा लागेल.

आमने-सामने (मागील 5 सामने)
मुंबई इंडियन्स – 1 | रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – 4

सामन्याची थोडक्यात माहिती
दिनांक: 26 जानेवारी 2026
वेळ: संध्याकाळी 7:30 वाजता
स्थळ: कोटांबी स्टेडियम, वडोदरा
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओहॉटस्टार