वूमन्स प्रीमियर लीग (WPL) 2026 निर्णायक वळणावर येऊन पोहोचली असून, प्ले-ऑफसाठीची चुरस आता कमालीची वाढली आहे. अजूनही दोन जागा खुल्या असल्याने प्रत्येक सामना “करो की मरो” असा ठरत आहे. WPL 2024 चे विजेते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) आधीच प्ले-ऑफमध्ये स्थान पक्के केले असले, तरी उर्वरित चार संघ उरलेल्या दोन जागांसाठी पूर्ण जोर लावत आहेत.
आज वडोदऱ्यातील कोटांबी स्टेडियमवर दोन दावेदार आमने-सामने येणार आहेत—गुजरात जायंट्स आणि जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली दिल्ली कॅपिटल्स. दिल्लीचा आत्मविश्वास सध्या शिखरावर आहे. याच मैदानावर त्यांनी मागील दोन सामन्यांत RCB आणि मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवला आहे.
या दोन संघांमधील मागील लढत 11 जानेवारीला नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडेमीत झाली होती आणि ती WPLच्या इतिहासातील अविस्मरणीय सामन्यांपैकी एक ठरली. सामन्यात 400 हून अधिक धावा झाल्या, दिल्लीच्या नंदनी शर्माने या हंगामातील पहिली हॅटट्रिक घेतली, तर गुजरातची सोफी डिव्हाईन अवघ्या काही धावांनी WPLमधील पहिल्या शतकापासून दूर राहिली.
सामन्याच्या बहुतांश वेळेत दिल्लीचे वर्चस्व दिसत असले तरी अखेरच्या षटकात नाट्यमय उलटफेर घडला. सहा चेंडूंमध्ये सात धावांची गरज आणि सात विकेट्स हाताशी असताना दिल्लीचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात होता. मात्र, आधी फलंदाजीत 42 चेंडूंमध्ये 95 धावांची तडाखेबंद खेळी करणाऱ्या डिव्हाईनने चेंडू हातात घेतला आणि फक्त दोन धावा देत दोन महत्त्वाचे फलंदाज बाद केले—कर्णधार जेमिमा रोड्रिग्ज आणि अर्धशतकवीर लॉरा वोल्वार्ड्ट. माजी न्यूझीलंड कर्णधाराने केलेला हा खऱ्या अर्थाने ‘डिव्हाईन इंटरव्हेन्शन’ ठरला आणि पराभवाच्या जबड्यातून गुजरातने विजय खेचून आणला.
आता दोन आठवड्यांहून अधिक कालावधीनंतर दोन्ही संघ पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकत आहेत. उद्दिष्ट मात्र समान आहे—विजय मिळवणे, गुणतालिकेत आपली स्थिती मजबूत करणे आणि प्ले-ऑफची आशा कायम ठेवणे.
परदेशी तारांकित खेळाडू लक्ष वेधून घेणार असले तरी भारतीय खेळाडूंवरही विशेष नजर असेल. गुजरातची भारती फुलमली आणि दिल्लीची नंदनी शर्मा या दोघीही चर्चेत असतील. 2019 नंतर टी-20 आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या फुलमलीला 2026 मध्ये पुन्हा भारतीय संघात संधी मिळाली असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तिची निवड झाली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरी आणि WPL मधील आक्रमक खेळाचे तिला फळ मिळाले आहे. 31 वर्षीय फुलमली प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा घेण्यास उत्सुक असेल. दुसरीकडे, WPLमधील पहिल्याच हंगामात खेळणारी नंदनी शर्मा सध्या स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज आहे. गुजरातविरुद्ध याच हंगामात घेतलेल्या ‘पाच विकेट हॉल’ मधून ती पुन्हा प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करेल.
दिल्लीसाठी पुन्हा एकदा मुंबईकर जेमिमा रोड्रिग्ज केंद्रस्थानी असेल. प्रथमच दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणारी जेमिमा, मागील तीनही हंगामांत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तिच्या नेतृत्त्वासोबतच तिची फलंदाजी दिल्लीसाठी महत्वाची ठरणार आहे. मारिझान काप, स्पर्धेतील सर्वात किफायतशीर गोलंदाज, लिझेल ली आणि शेफाली वर्मा यांची स्फोटक सलामी जोडी, तसेच तिसऱ्या क्रमांकावर खेळणारी जगातील अव्वल एकदिवसीय फलंदाज लॉरा वोल्वार्ड्ट यांचा मजबूत पाठिंबा दिल्लीकडे आहे.
दुसरीकडे, जगातील अव्वल एकदिवसीय अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार ऍश्ले गार्डनरच्या नेतृत्वाखालील गुजरात जायंट्सही संतुलित आणि ताकदवान संघ म्हणून मैदानात उतरणार आहेत. सोफी डिव्हाईन, बेथ मूनी आणि रेणुका सिंग ठाकूर यांसारखे सामना फिरवू शकणारे खेळाडू गुजरातकडे आहेत. मात्र, सध्या जबरदस्त लयीत असलेल्या दिल्लीला रोखणे सोपे नसेल. या हंगामात चढ-उतार अनुभवलेल्या गुजरातला, याच प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध मिळवलेल्या त्या थरारक विजयातूनच आत्मविश्वास घ्यावा लागेल.
गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील या अत्यंत तणावपूर्ण लढतीत सर्व काही पणाला लागले असून, प्रेक्षकांना प्रचंड उत्कंठा, नाट्य आणि आतषबाजीने भरलेला सामना पाहायला मिळणार, यात शंका नाही.
आमने-सामने (मागील 5 सामने)
गुजरात जायंट्स – 2 | दिल्ली कॅपिटल्स – 3
सामन्याची थोडक्यात माहिती
दिनांक: 27 जानेवारी 2026
वेळ: संध्याकाळी 7:30 वाजता
स्थळ: कोटांबी स्टेडियम, वडोदरा
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओहॉटस्टार