बुलेट ट्रेनच्या मार्गावर म्हातार्डी स्थानक होणार जंक्शन

दिवा परिसराच्या विकासाचा मार्ग होणार मोकळा

आनंद कांबळे/ठाणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनचे जंक्शन म्हणून दिवा ग्रामिणमधील म्हातार्डी स्टेशनला पसंती देण्यात आली आहे. या स्टेशनमुळे दिवा परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा पंतप्रधान श्री. मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मुंबई येथिल बीकेसीमध्ये बुलेट ट्रेनचे रेल्वे स्टेशन असून जमिनीखालून हा मार्ग शीळपर्यंत येऊन दुसरे उन्नत रेल्वे स्टेशन दिवा भागातील म्हातार्डी येथे होणार आहे. त्यासाठी जमिन देखिल हस्तांतरित करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात अहमदाबाद येथे जाणारी ट्रेन म्हातार्डी मार्गाने जाणार असून दुसऱ्या टप्प्यात हैद्राबाद येथे बुलेट ट्रेन जाणार आहे. तिचा मार्ग म्हातार्डी येथून जाणार आहे, त्यामुळे म्हातार्डी हे स्थानक जंक्शन होणार आहे. हैद्राबाद येथे जाणारी ट्रेन म्हातार्डी-पुणेमार्गे जाणार असल्याने पुण्याला अवघ्या एक ते दीड तासात बुलेट ट्रेनने पोहचता येणार आहे. त्यामुळे म्हातार्डी स्टेशनला महत्व प्राप्त होणार आहे.

अहमदाबाद येथे जाणाऱ्या बुलेट ट्रेनचा दुसऱ्या टप्प्यात दिल्लीपर्यंत विस्तार केला जाणार आहे. दिल्ली येथे बीकेसी येथून अवघ्या साडे तीन तासात पोहचता येणार आहे, त्यामुळे नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण या भागातील प्रवाशांना हे स्टेशन जवळचे असणार आहे.

दिवा रेल्वे स्टेशन कोकण मार्गांवरील जंक्शन स्टेशन आहे. कोकणात तसेच दक्षिणेत जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना दिवा येथे थांबा आहे. त्यामुळे या भागातील नागरिकरण मोठ्या प्रमाणावर वाढत असून बुलेट ट्रेनचे जंक्शन म्हातार्डी येथे झाल्यानंतर या भागाचे महत्व वाढणार आहे तसेच येथून नवी मुंबई विमानतळ आणि तळोजा मेट्रो रेल्वेमार्ग देखिल जवळ आहे. त्याचा फायदा या परिसरातील नागरिकांना होणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.