मुंबई: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव पहिला टप्पा डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केले आहे. त्यानुसार नुकतेच इंडिपेडन्ट सेफ्टी असेसमेन्ट (आयएसए) अर्थात स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
आता सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या दृष्टीने लवकरच, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) पथकाला पाचारण करण्यात येणार आहे. या पथकाकडून सुरक्षा चाचण्या झाल्यास सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त होईल आणि त्यानंतर दहिसर ते काशीगाव मार्गिकेच्या संचलनाचा मार्ग मोकळा होईल. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मीरा-भाईंदरवासियांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे.
एमएमआरडीएकडून दहिसर-मीरारोड अंतर कमी करून परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी १३.५ किमी लांबीच्या मेट्रो ९ चे काम सुरु करण्यात आले आहे. ही मार्गिका दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेचा विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील पश्चिम उपनगरे थेट मीरा-भाईंदर शहराशी जोडली जाणार आहेत.
या मार्गिकेत १० स्थानकांचा समावेश असून मार्गिकेच्या बांधकामासाठी ६६०० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या मार्गिकेचे काम दोन टप्प्यात करण्यात येत असून पहिला टप्पा दहिसर ते काशीगाव असा ४.५ किमीचा आहे. या टप्प्याचे बांधकाम आणि यंत्रणांचे काम पूर्ण झाल्याने काही दिवसांपूर्वीच या मार्गिकेवरील गाड्यांसह विविध यंत्रणांच्या चाचण्यांना सुरुवात करण्यात आली.
आता दहिसर ते काशीगाव टप्प्याला इंडिपेडन्ट सेफ्टी असेसमेन्ट (आयएसए) अर्थात स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती एमएमआरडीएतील उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आता लवकरच रिसर्च डिझाईन अँड स्टॅन्डर्ड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) प्रमाणपत्र प्राप्त होईल. दुसरीकडे दहिसर ते काशीगाव टप्प्याचे संचलन करण्यासाठीच्या शेवटच्या प्रक्रियेला अर्थात सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुरक्षा प्रमाणपत्र घेण्यासाठी सीएमआरएसच्या पथकाला पाचरण करण्यासाठीची प्रक्रिया एमएमआरडीएकडून सुरु आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सीएमआरएसचे पथक मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांच्याकडून आवश्यक त्या चाचण्यांना, तपासणीला सुरुवात करत सुरक्षा प्रमापत्र दिले जाणार आहे. हे सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर दहिसर ते काशीगाव मार्गिकेचे लोकार्पण करत मिरा-भाईंदरवासियांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण केले जाणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २५ डिसेंबरला या मार्गिकेचे लोकार्पण करण्याचे नियोजन आहे. मात्र ही अंतिम तारीख नसून ही तारीख मागेपुढे होऊ शकते असेही सूत्रांनी सांगितले. मात्र दहिसर ते काशीगाव टप्प्याच्या सुरक्षा प्रमाणपत्राच्या प्रक्रियेला आता सुरुवात होणार असल्याने हा टप्पा दृष्टीक्षेपात आला आहे.