मीरा-भाईंदर परिवहन सेवेच्या बसला ‘दे धक्का’

भाईंदर: ठेकेदाराच्या भरवशावर सुरू असलेल्या मीरा-भाईंदर महापालिका परिवहन सेवेतील खटारा झालेल्या बसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागत असून रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास दहिसर येथून काशिमिरा येथे आलेली बस अचानक बंद पडल्याने प्रवाशांच्या खोळंबा झाला. बस चालू करण्यासाठी बसमधून उतरलेल्या प्रवाशांसह वाहतूक पोलिसांनीही बसला धक्का मारण्यासाठी हातभार लावला.

दोनच दिवसांपूर्वी परिवहन सेवेतील चालक व वाहकांनी त्यांची इच्छित देणी मिळत नसल्याने अचानक सकाळच्या सुमारास संप पुकारून बससेवा बंद केली होती. ठेकेदाराच्या भरवशावर सुरू असलेल्या महापालिका परिवहन सेवेतील बस परिवहन सेवेला तांत्रिक अनुभव असलेला अधिकारी उपलब्ध नसल्याने महापालिका परिवहन बस सेवा ठेकेदाराच्या इशाऱ्यावर सुरू आहे. एकूण 28 बसेस दुरुस्तीअभावी घोडबंदर येथील आगारात दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याने बस प्रवाशांना इच्छित बस पकडण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे. अशातच रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास दहिसर येथून आलेल्या बस क्रमांक (एम एच ०४ ईपी ०५२९) या बसचा तांत्रिक बिघाड झाल्याने बस तिथेच उभी राहिली. बसमधील प्रवाशांनी चालक व वाहकाशी वाद घालून आम्ही जर तिकिटाचे पैसे पूर्ण दिले आहेत तर आम्हाला आमच्या इच्छितस्थळी सोडण्याची व्यवस्था करा, यावरून बाचाबाची झाली. मात्र थोड्याच वेळात प्रवाशांनी समझोता करून बंद पडलेल्या बसला धक्का मारून चालू करण्यासाठी हातभार लावत वाहतूक पोलिसांचाही मदत घेतली.

धक्का स्टार्ट झालेल्या बसला प्रवास करण्यासाठी बसमध्ये प्रवासी बसले, मात्र गियरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना बसमधून उतरून खाजगी वाहनाने आपल्या इच्छितस्थळी जावे लागले. खिळखिळ्या झालेल्या खटारा बसमधून दररोज हजारो प्रवाशांना प्रवास करावा लागत असून पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने प्रवासी परिवहन सेवेच्या अधिकाऱ्यांना लाखोली वाहत आहेत.