भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन
कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेला लागलेले विकासाचे ग्रहण दूर करण्यासाठी इकडे भाजपचा महापौर असणे आवश्यक आहे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कल्याणात व्यक्त केले.
कल्याणातील काही सामाजिक कार्यकर्ते आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भाजप पक्षप्रवेशानिमित्त झालेल्या सोहळ्यात ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात विकासाचा झंजावात सुरू असून अनेक पक्षांतील पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. कल्याणचा हा संपूर्ण परिसर आपल्याला भाजपमय करायचा असून त्यासाठी आपण सर्वांनी संघटनात्मकदृष्ट्या एकत्रित काम करण्याचे आवाहनही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी यावेळी केले.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार सुलभा गायकवाड आदी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कल्याण पश्चिमेतील महाजनवाडी सभागृहात हा पक्ष प्रवेश सोहळा झाला.