कल्याणात मनसे, शरद पवार गटाचा खुला तर काँग्रेसचा छुपा पाठिंबा
कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेत निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या राजकिय घडामोडींना वेग आला आहे. मनसे आणि शरद पवार गटाने शिवसेना शिंदे गटाला खुला तर काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी छुपा पाठिंबा दिला आहे. यामुळे शिवसेनेने बहुमताचा आकडा गाठला असून महापालिकेवर शिंदे गटाचा झेंडा फडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेत शिवसेनेचे ५३ नगरसेवक असून भाजपकडे ५० नगरसेवक आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे गटाला आणखी नऊ नगरसेवकांची तर भाजपला १२ नगरसेवकांची गरज आहे. ६२ ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी शिवसेना करत असलेल्या प्रयत्नांना यश आले असून मनसेचे पाच,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एक नगरसेवक रमिज मणियार यांनी खुला पाठिंबा दिला असून काँग्रेसच्या कांचन कुलकर्णी आणि समिना शेख या दोन नगरसेविकांनी बाहेरून पाठिंबा दिल्याचे समजते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे नॉट रीचेबल असून ठाकरे गटाने स्थापन केलेल्या गट नोंदणीवेळी देखील ते गैरहजर होते. तसेच ठाकरे गटाच्या मशाल या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत निवडून आलेले राहुल कोट आणि स्वप्नाली केणे या देखील मनसेच्या गट नोंदणीवेळी उपस्थित नव्हते त्यामुळे या चौघांचे देखील शिवसेनेला समर्थन मिळणार असल्याचे समजते.
महापौर पदासाठी ६२ नगरसेवकांची आवश्यकता असून सध्या शिवसेनेकडे ६५ नगरसेवकांचे संख्याबळ तयार झाले आहे. त्यामुळे भाजपाला सोबत न घेता देखील शिवसेना सत्ता स्थापन करू शकते, अशी चर्चा राजकिय वर्तुळात रंगली आहे.