हरदोईमधील कारखान्यातून दोन कोटींचे साहित्य जप्त
भाईंदर : मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४ च्या पथकाने अमली पदार्थ विरोधी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. नुकताच मीरारोड येथील अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्याचा माग काढत पथकाने थेट उत्तरप्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात मेफेड्रॉन तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत २.७ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आतापर्यंत या संपूर्ण आंतरराज्यीय रॅकेटमधून आतापर्यंत तब्बल २२ कोटी ७९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत २० आरोपींना अटक केली आहे. ४ एप्रिल २०२६ ला गुन्हे शाखेने मीरारोड पूर्व येथील बँक रोडवरील छेडा आदर्श इमारतीमध्ये राहणाऱ्या फिरदोस कुरेशी या महिलेच्या घरावर छापा टाकला होता. तिच्या घरातून पोलिसांनी दोन कोटी ६६ लाख १७,२८० रुपये किमतीचे एक किलो ३२४ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. हा साठा तिचा पती अरबाज कुरेशी याचा असल्याचे तपासात समोर आले.
याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला होता. या तपासादरम्यान पोलिसांनी मुंबईतील आग्रीपाडा, मालवणी, मनोरी परिसर आणि थेट तेलंगणातील जहिराबाद भागात छापे टाकून १८ आरोपींना अटक केली होती. तेथून एमडी ड्रग्ज, ते बनवण्यासाठी लागणारे रासायनिक द्रव्य आणि लॅबचे साहित्य असा तब्बल २०.७२ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
या तपासादरम्यान पोलिसांना उत्तरप्रदेशातील मुख्य अड्ड्याची माहिती मिळाली. १६ जून २०२६ रोजी पोलिसांनी उत्तरप्रदेशातील जिल्हा हरदोई अंतर्गत येणाऱ्या सण्डीला पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तसलीम आरिफ छुटटन ऊर्फ रज्जाक याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता, पोलिसांनी एका गुप्त कारखान्यावर छापा टाकला. या कारवाईत एक किलो २६ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज. एमडी बनवण्यासाठी लागणारे ३०० लिटर एमएमए रसायन, हिटींग ड्रायर, सेप्रेशन फ्लास्क, हिटींग मॅन्टल रिकव्हरी फ्लास्क, फोर फिंगर क्लॅम्प, अॅडीशन पॉट, बुकनर फनेल असे ड्रग्ज बनवण्याचे लॅब साहित्य असा एकूण २.०७ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून, या गुन्ह्यातील एकूण जप्ती आता २२.७९ कोटी रुपयांवर पोहचली आहे. या आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करी रॅकेटमध्ये आतापर्यंत २० आरोपी अटक केले आहेत.
ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४ चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक आणि त्यांच्या पथकातील अंमलदार शिवाजी पाटील, रविंद्र भालेराव, विजय गायकवाड, प्रविणराज पवार यांच्यासह सायबर सेलच्या पथकाने केली आहे.