भाईंदर: दहिसर (पश्चिम) येथील लिंक रोडपासून मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (पश्चिम) पर्यंतच्या विस्तारीत कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत ४५ मीटर रुंद उन्नत रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
किनारी रस्ता शेवटचा टप्पा असलेल्या प्रकल्प कामांसाठी सल्लागार म्हणून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार मेसर्स निप्पोन कोई इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व मेसर्स काईट अलाईड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (संयुक्त भागीदार) कंपनीची निवड करण्यात आली अहे. यासाठी ५२ कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
वांद्रे ते वर्सोवा आणि वर्सोवा ते दहिसर आणि पुढे भाईंदरपर्यंत कोस्टल रोडचा विस्तार केला जात आहे. यातील ‘दहिसर (पश्चिम) लिंक रोड ते भाईंदर (पश्चिम) पर्यंत ४५ मीटर रुंद उन्नत मार्ग बांधणे बांधण्यात येत आहे. या उन्नत मार्गाची अर्थात पुलाची एकूण लांबी ४.५८ कि.मी (४+४ मार्गिका) आहे. या एकूण लांबीतील १.४५ कि.मी लांबी ही बृहन्मुंबई महापालिका हद्दीत असून ३.१३ कि.मी लांबी ही मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीमध्ये आहे. हे काम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात येणार आहे. या प्रकल्प कामासाठी यापूर्वी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आलेली असून याकरता आता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात येत आहे.
या प्रकल्प कामाशी निगडीत कंत्राटदाराने सादर केलेली सर्व संकल्प चित्रे, आरखडे, संरचना यांची तपासणी तसेच प्रकल्पात अंतर्भूत कामांचे दैनंदिन पर्यवेक्षण, प्रकल्पात वापरण्यात येणा-या सामुग्रीची गुणवत्ता तपासणे, प्रकल्पात नमूद बांधकामांची गुणवत्ता तपासणे, प्रकल्प कंत्राटदाराने सादर केलेल्या देयकाची तपासणी करणे व प्रकल्प निविदेत तथा शुध्दीपत्रकात नमूद असलेल्या कामाच्या व्याप्तीनुसार देखरेख करणे इत्यादी कामे अंतर्भूत असतील. या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांची नेमणूक करण्यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये मेसर्स निप्पोन कोई इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व मेसर्स काईट अलाईड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (संयुक्त भागीदार कंपनी) पात्र ठरली असून ५२ कोटी ५० लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.