ठाणेवैभव आंतरकार्यालयीन क्रिकेट करंडक स्पर्धा
ठाणे: ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट करंडक स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या मार्श मिलेनिअन संघाने क गटात उपांत्य फेरीत मटेरियल ऑर्गनायजेशन संघाचा एक गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली.
दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात नाणेफेकीचा मान ज्येष्ठ क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि एमसीए निरीक्षक परेश नाखवा यांना देण्यात आला. मटेरियल ऑर्गनायजेशन संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. मार्शच्या श्रेयश केसकर आणि आशुतोष घागरे यांच्या माऱ्यापुढे सर्वेश दळवी वगळता एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सर्वेश दळवी याने ५९ धावा केल्या. त्या पाठोपाठ अभिषेक जैन २८, प्रतीक देसाई २५ आणि कुंजन ठाकूर याने २४ धावांचे योगदान दिले. ३४ षटकांत सर्व गडी बाद १९४ धावा मटेरियल ऑर्गनायझेशन संघाला करता आल्या. मार्शच्या श्रेयश केसकर याने सात षटकांत २८ धावा देत तीन गडी बाद केले तर आशुतोष घागरे याने ३२ धावा देत दोन गडी बाद केले. केतन खरात, किरण देसाई, शिवप्रकाश जैस्वाल आणि अभिषेक डिसले यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
‘मार्श’च्या सुरुवातीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. प्रदीप शर्मा ३९, असिफ खान नाबाद ३३, अक्षय माजगावकर ३०, शिवप्रकाश जैस्वाल २४ आणि अजिंक्य पाटील याने २२ धावांचे योगदान दिले. ‘मार्श’ने ३४ षटकांतच एक गडी राखून सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. मटेरियल ऑर्गनायझेशनच्या मंगेश जाधव याने २६ धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद केले. सर्वेश दळवी, गोविंद पालयेकर आणि कुंजन ठाकूर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. ‘मार्श’चा श्रेयस केसकर सामनावीर ठरला.