शहापुरात बहरणार हायटेक शेती

शासनाची कृषी यांत्रिकीकरण योजना ठरते मैलाचा दगड

शहापूर: तालुक्यातील गेगाव गावच्या १२५ हेक्टरच्या शिवारात आता पारंपरिक शेतीसोबत आधुनिकतेची नवी चाहूल लागली आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर आणि कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हायटेक शेतीकडे वाटचाल सुरू झाली असून शेतकऱ्यांच्या काकडी,भेंडी व भाताच्या उत्पादन क्षमतेत आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेतीमधील वाढता खर्च आणि मजूर टंचाईवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी राज्य शासनाची कृषी यांत्रिकीकरण योजना मैलाचा दगड ठरत आहे. सहायक कृषी अधिकारी सचिन भालेराव यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली गेगाव येथील लाभार्थ्यांनी ‘कृषी औजार बँक’ योजनेतून आधुनिक यंत्रसामुग्रीची खरेदी पूर्ण केली असून यामुळे परिसरातील शेती आता प्रगतीच्या नव्या शिखराकडे झेपावण्यासाठी सज्ज झाली आहे. या योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या यंत्रांची प्रक्रिया पूर्ण झाली असून शासन स्तरावरून पात्र लाभार्थ्यांना लवकरच अनुदान वितरित केले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार हलका होण्यास मदत होईल.

सळुबाई गोंधळी, गणपत डोंगरे आणि विठ्ठल डोंगरे या लाभार्थ्यांनी या योजनेबद्दल आणि कृषी विभागाच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. गेगाव येथील आधुनिक शेतीचा हा प्रवास इथेच थांबणार नसून गावात आणखी दोन नवीन कृषी औजार बँकांचे काम प्रगतीपथावर आहे. त्यांची उर्वरित तपासणी प्रक्रिया देखील कृषी विभागामार्फत लवकरच पूर्ण केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या औजार बँकांमुळे गावात ट्रॅक्टर, रोटाव्हेटर आणि पेरणी यंत्रे यांसारखी आधुनिक साधने रास्त दरात उपलब्ध होतील. अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे योग्य यंत्रांची निवड झाल्याने आता कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे. दरम्यान कोणती यंत्रे निवडावीत आणि शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक प्रक्रिया कशी पूर्ण करावी यासाठी सचिन भालेराव यांनी लाभार्थ्यांना वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले. नुकतीच किन्हवली विभागाचे मंडळ कृषी अधिकारी अशोक पवार आणि सचिन भालेराव यांनी या यंत्रांची प्रत्यक्ष पाहणी केली. कृषी मित्र हर्षल डोंगरे यांच्या समन्वयातून ही प्रक्रिया अत्यंत उत्साहात पार पडली.

शासनाची कृषी यांत्रिकीकरण योजना ही शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने मैलाचा दगड ठरत आहे. आधुनिक यंत्रसामग्रीमुळे शेतीची कामे जलद,अचूक आणि कमी खर्चात पूर्ण होणार असून उत्पादनक्षमता वाढण्यास मोठी मदत होणार आहे.यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासह शेती अधिक सक्षम व आधुनिक बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे उपक्रमशील शेतकरी हर्षल डोंगरे यांनी सांगितले.