माघी गणेशोत्सवासाठी ठाणे सज्ज

ठाणे: माघी गणेशोत्सवासाठी ठाणे सज्ज होत असून यावर्षी गणेश जयंतीला म्हणजे १३ फेब्रुवारीला ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये १९२५ श्रींच्या मुर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये सर्वाधिक १,७७६ श्री मूर्तींची स्थापना घरी होणार असून १४९ सार्वजनिक मडळेही श्रींच्या स्वागतासाठी सज्ज होत आहेत.

यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवारी १२ फेब्रुवारीला सायंकाळी पावणेपाच वाजता सुरू होणार असून मंगळवारी १३ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजून ४१ मिनिटांपर्यंत असणार आहे. या दिवशी विनायक चतुर्थी असल्याने त्याच दिवशी गणेश जयंती साजरी होणार आहे. त्यामुळे गणपती मुर्तींच्या स्थापनेचा मुहूर्त हा सकाळी ११ वाजून ४० मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ५८ मिनिटांपर्यंत असणार आहे. अवघ्या दोन ते तीन तासांमध्ये श्रींची स्थापना होणार असल्याने आणि अनेकजण त्याच दिवशी सत्यनारायण पूजाही करणार असल्याने भटजींपासून देखावा, पूजेच्या साहित्याची जुळवाजुळव करण्यात चाकरमानी व्यस्त झाले आहेत.

यावर्षीही घरी स्थापन होणार्‍या १७७६ पैकी १२१९ बाप्पा दीड दिवस पाहुणचार घेणार आहेत. विशेष म्हणजे यावर्षी लोकसभा निवडणुकीची धामधुम आहे. त्यामुळे अनेक गणेश मंडळांना राजकीय पक्षांकडूनही देणग्या मिळाल्या असल्याने शहरात अनेक ठिकाणी भव्य मंडप, मंदिरांची प्रतिकृती उभारण्यात येत आहे. आयुक्तालय परीसरात यावर्षी १४९ ठिकाणी सार्वजनिक माघी गणेशोत्सव साजरा होत आहे. यामध्ये सर्वाधिक अधिक सार्वजनिक ६६ गणपती कल्याण परिमंडळात आहेत.

शहर/विभाग घरगुती सार्वजनिक
ठाणे ३३६ २२
भिवंडी ६९३
कल्याण ३२३ ६६
उल्हासनगर २५९ २६
वागळे १६५ २९

 

दिवस                    घरगुती सार्वजनिक
दीड दिवस १२१९ ३७
पाच दिवस ३९८ ७८
सहा दिवस १९ ०७
सात दिवस ११० २६
१० दिवस ३९ ०६