राज्यातील ‘त्या’ शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्या शेतकऱ्यांचे ५० हजारांऐवजी दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कुठल्याही कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही किंवा होऊ शकत नाही. शेतकऱ्याला सावकाराकडे जावे लागणार नाही, हे कर्जमाफीमागचे उद्दिष्ट असते. आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी शब्द दिला होता की आम्ही कर्जमाफी करू. खरं तर कर्जमाफी देण्यासाठी २०२९ पर्यंत आम्ही थांबू शकलो असतो. कारण आम्ही सर्व निवडणुका जिंकलो आहोत. मात्र, आम्ही तसं केलं नाही. आम्ही ठरवलं की शेतकरी अडचणीत असेल तर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. त्यामुळे आपल्या सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

कर्जमाफीच्या व्यतिरिक्त दरवर्षी २५ हजार कोटी रुपये वीजमाफी सरकार देते. हे पैसे भरावे लागतात. पहिल्या वर्षी २० हजार कोटी, दुसऱ्या वर्षी २२ हजार कोटी आणि तिसऱ्या वर्षी २५ हजार कोटी रुपये आपण भरतो. आता कर्जमाफीचा निर्णय घेताना सर्व बँकांची बैठक घेतली आणि त्यानंतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ आपण जाहीर केली. या माध्यमातून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६,५८५ कोटींचा लाभ देणारी ही कर्जमाफी योजना आहे”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेत आपण दोन लाखांपेक्षा जास्त ज्यांची बाकी आहे, त्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी योजनेचा लाभ देत आहोत. आपल्याला शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असताना बँकिंग सिस्टिमचाही काही विचार करावा लागतो. आता या कर्जमाफीबाबत खूप अटीशर्ती आहेत, यावरून सवाल विचारले गेले. काही आमदार मला भेटले आणि म्हणाले की शेतकरी कर्जमाफीतील ५० हजारांची ती अट काढून टाका. तेव्हा मी त्यांना सांगितलं की जर ही अट काढली तर सरकारला ३ ते ४ हजार कोटींचा भुर्दंड येईल. ही अट एक शिस्तीचा भाग म्हणून आपण ठेवली होती”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“आता ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्यांना आपण ५० हजार रुपयांची अट घातली होती. त्या माध्यमातून ५० हजार रुपयांपर्यंत कर्जमाफी आपण म्हटलं होतं. मात्र, आता महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही थेट दोन लाखांपर्यंत कर्जमाफी मिळेल. त्याचबरोबर २०२६-२७ चा कर्ज भरण्याच्या संदर्भातील नियम वगळण्यात येईल. म्हणजे २०२६ ला किती लोकांनी कर्ज भरलं, तर ९५ टक्के लोकांनी भरलं. त्या आधीच्या तीन पैकी दोन वर्षात ज्यांनी पैसे भरले ते देखील आता पात्र होतील”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना दिली आहे.