चाळीची गॅलरी घरावर कोसळून मुलाचा मृत्यू

आई आणि लहान भाऊ जखमी

ठाणे : घोडबंदर रॊड येथिल आझादनगर येथिल एका चाळीची गॅलरी दुसऱ्या घरावर पडून झालेल्या दुर्घटनेत एका लहान मुलाचा मृत्यू झाला असून आई आणि लहान भाऊ जखमी झाला. या दुर्घटनेने पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आझाद नगर ब्राह्मण्ड येथे मदराशी चाळ असून आज दुपारी ३. ३०च्या सुमारास या चाळीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळून समोरच्या घरावर कोसळल्याने या घरात झोपलेल्या उर्मिला जैस्वाल (३५) जयकुमार जैस्वाल (१२) आणि विनीत जैस्वाल हे जखमी झाले. विनीत याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याला मानपाडा येथिल टायटन या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर जयकुमार जैस्वाल हा जबर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती पोलिस हवालदार श्री. गर्जे यांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाला कळविल्याने या दोन्ही विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले. या चाळीतील तीन घरे रिकामी करून येथे राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे मनिषा सावंत यांच्या मालकीची ही चाळ २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधली असून त्यामध्ये तीन कुटुंबे राहत होती. या दुर्घटनेची माहिती मिळताच नगरसेवक लहू पाटील, उपायुक्त दिनेश तायडे, सहायक आयुक्त सोनल काळे, अग्निशमन दलाचे प्रमुख गिरीश झळके, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे यासिन तडवी कापुरबावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पोलिस कर्मचारी अग्निशमन दलाचे आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या दुर्घटनेची नोंद कापुरबावडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.