कल्याण: डोंबिवलीतील पवार पब्लिक स्कुल येथील इयत्ता नववीत शिकणाऱ्या १४ वर्षीय आरव आहुजा याने खुल्या समुद्रात रायगड येथील पिरवाडी बीच ते मुंबईतील ट्रॉम्बे जेट्टी दरम्यान पोहण्याचा पराक्रम करत पहिला जलतरणपटू होण्याचा मान मिळवला आहे.
आरवने अपूर्व जिद्द, शारीरिक क्षमता आणि मानसिक ताकद दाखवत सुमारे २३ किलोमीटरचे अंतर अवघ्या चार तास १४ मिनिटांत पूर्ण केले. अरबी समुद्रातील आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात त्याने संपूर्ण पोहण्यादरम्यान उल्लेखनीय चिकाटी आणि आत्मविश्वासाचे प्रदर्शन केले. आरव हा ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर, पलावा येथे कार्यरत असलेल्या रुपाली रेपाळे स्विमिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असून तो दररोज सुमारे ३ ते ४ तास कठोर सराव करतो. विशेष म्हणजे, वयाच्या नवव्या वर्षी जेव्हा त्याने पोहण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याला पाण्याची भीती वाटत होती. मात्र सातत्यपूर्ण प्रशिक्षण, पालकांचे प्रोत्साहन आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्याने त्या भीतीवर मात करत खुल्या समुद्रातील पोहण्यामध्ये विशेष प्राविण्य मिळवले.
आरवने यापूर्वीही राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नुकत्याच कोची येथे पार पडलेल्या ओपन नॅशनल स्विमॅथॉन स्पर्धेत त्याने १० कि.मी. शर्यतीमध्ये रौप्यपदक पटकावले. तसेच पोरबंदर येथे झालेल्या राष्ट्रीय खुल्या जलतरण स्पर्धेत १० कि.मी. गटात कांस्यपदक जिंकले आहे. याशिवाय राज्यस्तरीय खुल्या जलतरण स्पर्धांमध्येही त्याने अनेक पदके आणि गौरव संपादन केले आहेत.
ही ऐतिहासिक समुद्र पोहण्याची मोहीम आरवची पहिलीच एकल लांब पल्ल्याची समुद्रातील पोहण्याची मोहीम होती, त्यामुळे या यशाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या पोहण्यादरम्यान त्याला जोरदार वारे, उंच भरती आणि खवळलेल्या समुद्राच्या लाटांचा सामना करावा लागला. मात्र सर्व अडचणींवर मात करत त्याने यशस्वीरित्या हे आव्हान पूर्ण केले. या कामगिरीदरम्यान शेवटच्या टप्प्यात डॉल्फिन माशांनी आरवच्या सोबत पोहत त्याच्या या यशात एक विस्मरणीय आणि प्रेरणादायी क्षण निर्माण केला. ही संपूर्ण मोहीम महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या निरीक्षणाखाली पार पडली असून सर्व अधिकृत नियम, सुरक्षा निकष आणि प्रक्रियांचे काटेकोर पालन करण्यात आले.
आपल्या यशाबद्दल बोलताना आरवने आपल्या आई-वडिलांचे त्यांच्या सततच्या पाठिंबा आणि प्रोत्साहनाबद्दल आभार मानले. तसेच त्याने आपले प्रशिक्षक रुपाली रेपाळे आणि अनिरुद्ध महाडिक यांचे मार्गदर्शन आणि मेहनतीबद्दल विशेष आभार व्यक्त केले. तसेच संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर यांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दलही त्याने कृतज्ञता व्यक्त केली.