लार्ज क्रेकर्स फटाक्यांचा आवाज ११० डेसिबलवर!

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फटाक्यांची चाचणी

ठाणे : फटाक्यांच्या आतषबाजीशिवाय दिवाळी साजरी करणे उत्सव प्रेमींना शक्य होत नाही. त्यामुळेच या सणाचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा वापर होतो. मात्र हेच फटाके हवा आणि ध्वनी प्रदूषण करणारे ठरू लागल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यावर बंदी घातली आहे. फटाके उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना त्याबाबतचे सक्त निर्देश देण्यात आले असून नियमांचा भंग करणाऱ्या कारखाने आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठाण्यात 25 प्रकारच्या फटाक्यांची चाचणी घेण्यात आली.

दिव्यांचा सण म्हणून दिवाळीकडे पाहिले जाते. यासोबतच फटाक्यांची आतिषबाजी करणारा सण म्हणून देखील हा सण प्रसिद्ध आहे. त्यामुळेच दिवाळीमध्ये फटाके फोडले जातात, मात्र फोडले जाणारे फटाके ध्वनी आणि वायु प्रदूषण करणारे ठरू लागले आहेत. असे फटाके फोडल्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान मुले यांना प्रदूषणाचा त्रास होत आहे. या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुढाकार घेतला आहे. बाजारात विक्रीसाठी आलेल्या फटाक्यांवर मंडळाची नजर असून प्रदूषण पसरवणारे संशयित फटाके ताब्यात घेऊन त्यांची मोकळ्या मैदानात फोडून चाचणी केली जाते.

गुरुवारी (ता.16) मंडळाने उप प्रादेशिक अधिकारी आनंद काटोले आणि संजीव रेदासानी यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची चाचणी घेतली. यावेळी ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाचे कनिष्ठ केमिस्ट ओम परळकर, स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते. ठाण्यातील रायला देवी तलावाच्या मोकळ्या जागेत ही चाचणी घेण्यात आली. यामध्ये विविध स्टॉलवरून खरेदी करून आणलेल्या 25 प्रकारचे फटाके फोडण्यात आले. त्यामध्ये लार्ज क्रेकर्स फटाक्यांच्या 110. 4 डेसिबल आवाजाची नोंद झाली तर सर्वात कमी 62.3 डेसिबल आवाज देणाऱ्या टू साउंड नामक फटाक्याची नोंद झाली.

जास्त आवाज देणारे पहिले दहा फटाके

लार्ज क्रेकर्स: 110.4 डेसिबल, 24 डिलक्स: 94.9 डेसिबल, बिग क्रेकर्स: 93.2 डेसिबल, स्मॉल क्रेकर्स: 86.7 डेसिबल, लावा विलकनो: 86.5 डेसिबल, स्मॉल लड: 84.3 डेसिबल, स्वेडन सोनी: 83.8 डेसिबल, सुप्रीम हल्कवार: 83.5 डेसिबल, ऍटम बॉम्ब: 80.4 डेसिबल, ट्रिपल बार: 78.3 डेसिबल

बाजारात विकल्या जाणाऱ्या फटाक्यांची ध्वनी पातळी किती आहे, याची चाचणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केली जाते. यामध्ये 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाज असणारे फटाके आढळले तर त्या कंपनी आणि विक्रेत्यावर कारवाई केली जाते, अशी माहिती संजीव रेदासानी, उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ठाणे यांनी दिली.

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रदूषण नियंत्रणासाठी जनजागृती केली जाते. फटाके कारखान्यांना ग्रीन फटाके बनवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामध्ये वायु प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळण्यात आले आहेत. नागरिकांनीही फटाके फोडायचेच असतील तर फटाक्यांच्या बॉक्सवर ग्रीन लेबल असलेले फटाके फोडावेत, असे आवाहन आनंद काटोले, उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी केले आहे.