अनधिकृत स्टाॅल-टपऱ्यांविरुद्ध मीरा-भाईंदर महापालिकेची कारवाई

भाईंदर: अनधिकृत टपऱ्या आणि स्टाॅलविरोधात मीरा-भाईंदर महापालिकेने विशेष मोहीम सुरू केली. भाईंदर पश्चिम स्टेशन रोड परिसरातील रस्त्यावरील तसेच पदपथावरील अनधिकृत छपरे, हातगाड्या आणि शाळा परिसरातील १०० मीटरपर्यंत असलेल्या पानटपऱ्यांवर कारवाई करून पदपथ, रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम सुरू आहे.

महानगरपालिकेची अनधिकृत अतिक्रमण हटाव कारवाई १५ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू करण्यात आली आहे. भाईंदर पश्चिम स्टेशन परिसरातील पदपथावरील तसेच गाळ्यासमोरील अनधिकृत छपरे, शाळांच्या १०० मीटर परिसरातील तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा विक्रेते करणाऱ्या नऊ पानटपऱ्या, हातगाड्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत या कारवाईसाठी जेसीबी यंत्रणेचा वापर करून अनधिकृत बांधकामे व छपरे हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला.

ही कारवाई आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे आणि उपायुक्त (अतिक्रमण विभाग) कल्पिता पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रभागातील अतिक्रमणांवर काटेकोरपणे कारवाई केली जात आहे.