भिवंडी : भिवंडीत लाहोटी कंपाऊंडमध्ये राहणाऱ्या किन्नारगुरूची त्यांच्या शिष्यासमोर हत्या केल्याची घटना सोमवार १ मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. या घटनेने शहरातील कल्याणरोड़ येथील लाहोटी कंपाउंड या परिसरात खळबळ माजली आहे.
तौसिफ़ मलिक बागवान उर्फ बेबो असे मयत गुरुचे नाव असून तो लाहोटी कम्पाऊंडमधील सोमाणी सदन मधील दुसऱ्या मजल्यावर राहत होता. सोमवारी पहाटे २-३० वाजता तौसिफ़ उर्फ बेबो हा किन्नरांचा गुरु लाहोटी कंपाउंड मधील काकत नावाच्या कापड दुकानाच्या पायरीवर बसला होता. त्यावेळी शहरातील चव्हाण कॉलोनी मध्ये राहणारा किन्नर कामिल अन्सारी हा तेथे आला. त्याने तौसिफ़ उर्फ बेबो याच्याशी भांडण केले. त्यामुळे बेबो यांच्या सोबत राहणारे किन्नर जिशान अन्सारी उर्फ अदा, नूर शेख उर्फ टीना हे रूममधून बाहेर आले. त्यांच्या समोर कामिल अन्सारी याने भांडणाच्या रागात रस्त्यावर असलेल्या फरशीच्या तुकड्याने बेबोच्या डोक्यावर आणि डोळ्याच्या भुवईवर घाव केला. त्यामुळे बेबो उर्फ तौसिफ़ मलिक बागवान याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी किन्नर मोनीस फहीम अहमद अन्सारी उर्फ मोनालिसा याने शहर पोलीस ठाण्यात कमीत अन्सारीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पुढील तपास वपोनि चेतन काकडे हे करीत आहेत.